पावसाच्या पाण्यावर तरंगली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:08+5:302021-06-29T04:15:08+5:30
श्रीरामपूर : शहरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर असलेल्या दोन्ही भुयारी रस्त्याच्या पुलाखाली शनिवारी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने तळे साचले होते. ...

पावसाच्या पाण्यावर तरंगली कार
श्रीरामपूर : शहरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर असलेल्या दोन्ही भुयारी रस्त्याच्या पुलाखाली शनिवारी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने तळे साचले होते. या पाण्यात अडकून पडलेली एक कार चक्क पाण्यावर तरंगत होती.
श्रीरामपूर-गोंधवणी रस्त्यावर सय्यदबाबा दर्गाहजवळील पुलाखाली धो-धो बरसलेल्या पावसाचे पाणी साचले होते. गोंधवणीकडे जाणारी एक कार पाण्यात अडकून बंद पडली व पाण्यावर तरंगली. पुलाखाली अनेक तास पाणी साचून होते. शिवाजी चौकातून गोंधवणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गर्दी झाली.
शहरामध्ये दुसरा रेल्वे भुयारी पूल नेवासा रस्त्यावर आहे. तेथून कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने अडकून पडली. या पुलाखाली पाण्याचे तळे झाले होते. त्यात एक कार अडकून पडली होती. पाऊस उघडल्यानंतर नगरसेवक प्रकाश ढोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार ढकलत पाण्यातून बाहेर काढली.
दौंड, मनमाड रेल्वे मार्गावर श्रीरामपूर शहरात दोन भुयारी पूल आहेत. पुलाच्या खाली पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यावर पाणी साचते. शहराच्या दोन्ही बाजूंचा त्यामुळे संपर्क तुटतो.
नगरपालिकेने भुयारी रस्त्याखाली साचणारे पाणी साचले जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे व नगरपालिका या दोन्ही प्रशासनाने तंत्रज्ञ नियुक्त करून तेथील तांत्रिक दोष दूर करावा, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
-----------
फोटो आहे : २८०६ २०२१ पाऊस
शिवाजी चौकात रेल्वेमार्गाखाली साचलेल्या पाण्यात तरंगलेली कार.