११ मतदारसंघात बसपाकडून उमेदवार

By Admin | Updated: September 28, 2014 23:25 IST2014-09-28T23:09:44+5:302014-09-28T23:25:50+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने मागील पंचवार्षिकप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील अकोले वगळता ११ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत़

Candidates from BSP in 11 constituencies | ११ मतदारसंघात बसपाकडून उमेदवार

११ मतदारसंघात बसपाकडून उमेदवार

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने मागील पंचवार्षिकप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील अकोले वगळता ११ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत़ या पक्षाची जिल्ह्यात कोणत्याच मतदारसंघात प्रभावी ठरेल अशी ताकद नाही़ मात्र, पक्षाने अस्तित्वाची लढाई सुरु ठेवली आहे. एकीकडे मनसेसारख्या पक्षांना जिल्ह्यात उमेदवार देता आले नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, सेनेसारख्या पक्षांना ऐनवेळी ‘आयात’ उमेदवारांवर वेळ मारुन न्यावी लागली. त्या तुलनेत बसपाने पक्षातूनच उमेदवार देण्यात यश मिळविले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एक या प्रमाणे १२ उमेदवार रिंगणात होते़ मात्र, यातील एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कमही वाचविता आली नव्हती़ एकेकाळी मायावती यांचा उत्तरप्रदेशात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चांगला यशस्वी झाला होता़ २००९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या पक्षाने महाराष्ट्रातही हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता़
मात्र, हा पक्ष सर्वव्यापक होवू शकला नाही़ राज्यातील विदर्भ वगळता कोणत्याच अन्य ठिकाणी या पक्षाला पाय रोवता आले नाही़ जिल्ह्यात सन २००४ पासून हा पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे़ मात्र, कोणत्याच मतदारसंघात कधीच तुल्यबळ उमेदवार दिला गेला नाही़ ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविली ते पक्षाचे तालुका पातळीवर काम करणारे पदाधिकारी होते़ त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना बसपा उमेदवारांची कधीच दखल घेण्याची वेळ आली नाही़ यावेळीही जिल्ह्यातील ११ मतदारसंघात पक्षाने उमेदवार दिले आहेत़ मुळात राज्यपातळीवरच हा पक्ष सर्वव्यापक नसल्याने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र संघटना पातळीवर उमेदवार देण्याची किमया त्यांनी साधली, हेही नसे थोडके.
स्थानिक पातळीवर आणि स्वत:च्या बळावर पक्षाच्या अस्तीत्वासाठी सुरु असलेला हा लढा म्हणूनच दखलपात्र ठरावा. आता निवडणुकीत कोण, किती मते घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Candidates from BSP in 11 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.