अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता गुणवत्ता सिद्ध कशी करायची तसेच अकरावीला मनपसंत काॅलेजला प्रवेश मिळेल का? याची चिंता हुशार विद्यार्थ्यांना लागली आहे. दुसरीकडे निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी कसरतीचे ठरणार आहे.
शिक्षण विभागाने नियोजित केलेली सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांवरच गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दुसरीकडे अनेक हुशार विद्यार्थी सीईटी रद्द झाल्याने हिरमुसले आहेत. कारण अंतर्गत मूल्यमापनात कमी गुण मिळाल्याची अनेकांची तक्रार आहे. सीईटी झाली असती तर गुणवत्ता सिद्ध करून मनपसंत महाविद्यालयात प्रवेश घेता आला असता, परंतु आता दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश होणार असल्याने ज्यांना कमी गुण मिळाले त्यांच्या मनाला घोर लागला आहे. दुसरीकडे दहावीचा निकाल उच्चांकी लागल्याने प्रवेश देताना महाविद्यालयांनाही कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, शिक्षण संचालनालय कार्यालयाने काढलेल्या पत्रानुसार १४ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.
-------------
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ७०५६६
अकरावीची प्रवेश क्षमता - ७६६००
-------------
कोणत्या शाखेत किती जागा
कला -२९६००
वाणिज्य - १०९७०
विज्ञान - ३४०००
---------
महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कट ऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत.
-------------
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून एक-दोन दिवसांत अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्राप्त होईल. त्यानंतर जिल्ह्यात एकच वेळापत्रक जाहीर करून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाईल.
- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
-------------
सीईटी परीक्षा झाली असती तर नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली असती. कारण अंतर्गत मूल्यांकनात कमी गुण मिळाल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. याचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसेल. कारण त्यांना आता कुठेच दाद मागता येणार नाही.
- संतोष साळुंके, विद्यार्थी