कॅफोच्या निलंबनाचा ठराव

By Admin | Updated: May 24, 2014 00:41 IST2014-05-24T00:06:37+5:302014-05-24T00:41:28+5:30

अहमदनगर: अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना आजारी रजेवर गेलेले महापालिकेचे कॅफो प्रदीप शेलार यांच्या निलंबनाचा ठराव स्थायी समितीने केला.

CAFCO suspension resolution | कॅफोच्या निलंबनाचा ठराव

कॅफोच्या निलंबनाचा ठराव

अहमदनगर: अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना आजारी रजेवर गेलेले महापालिकेचे कॅफो प्रदीप शेलार यांच्या निलंबनाचा ठराव स्थायी समितीने केला. आयुक्त विजय कुलकर्णी यांनीही शेलार यांची रजा नामंजूर करत त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याचे समिती सभेत जाहीर केले. गत चार दिवसांपासून महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. पहिले दोन दिवस कॅफो शेलार उपस्थित होते. तिसर्‍या दिवशी मात्र त्यांनी आजारी रजा टाकली. त्याची शहानिशा करण्याचे आदेश सभापती किशोर डागवाले यांनी दिले होते. शुक्रवारी सभा सुरू होताच डागवाले यांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले. स्पष्टीकरण देताना आयुक्त कुलकर्णी म्हणाले, शेलार यांचा आजारी रजेचा अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र त्यासोबत सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र नसल्याने तो नामंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पीय सभेचे ते समन्वयक आहेत. त्यांनी अशाप्रकारे रजा टाकून निघून जाणे सयुक्तिक नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर दीप चव्हाण यांनी गत वर्षीही त्यांनी असाच प्रकार केला. त्यावेळी कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांची प्रवृत्ती बळावली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तरच सभा पुढे चालू करा असा पवित्रा घेतला. त्यावर आयुक्तांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्‍याच्या निलंबनाचा अधिकार मनपाला नाही, असे सांगितले. दीप चव्हाण यांनी मग शेलार यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्याला सर्वानी मंजुरी दिली. सभापती डागवाले यांनी स्थायी समितीचा निलंबनाचा ठराव व आयुक्तांचे कारवाईचे पत्र शासनाकडे पाठविण्याची सूचना केली. आयुक्त कुलकर्णी यांनी तसे करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सभा सुरू झाली. शेलार हे सदस्यांना अरेरावीची भाषा करून हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप बाळासाहेब बोराटे यांनी केला. वस्तुनिष्ठतेला धरून अर्थसंकल्प तयार करावा असे पत्र कॅफोंना नगरसेवकांनी दिले तरीही त्यांनी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सभापती डागवाले यांनी केली. ज्येष्ठ नगरसेवक दीप चव्हाण यांच्या अभ्यासूपणापुढे कॅफो प्रदीप शेलार यांची पोलखोल उघडी पडली. अर्थसंकल्प फुगीर केल्याच्या चव्हाण यांच्या आरोपावर तसेच प्रत्येक प्रश्नांवर शेलार निरूत्तर होते. शेलार यांचा बेजबाबदारपणा चव्हाण यांनीच उघडकीस आणला. स्थायीच्या अन्य सदस्यांनी मग शेलार यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला.

Web Title: CAFCO suspension resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.