सालकऱ्याचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

By Admin | Updated: July 8, 2016 23:36 IST2016-07-08T23:30:42+5:302016-07-08T23:36:45+5:30

अशोक निमोणकर, जामखेड ‘सून पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर २५ वर्षाचं साल सोडलं. मुलगा राम आमदार, नंतर मंत्री झाला. दीड वर्षाच्या कामाच्या जोरावर बढती मिळाली.

Cabinet Minister of a Year | सालकऱ्याचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

सालकऱ्याचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

अशोक निमोणकर, जामखेड
‘सून पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर २५ वर्षाचं साल सोडलं. मुलगा राम आमदार, नंतर मंत्री झाला. दीड वर्षाच्या कामाच्या जोरावर बढती मिळाली. वृध्दापकाळ व आम्हा दोघांना होणारा गुडघादुखीचा त्रास, यामुळे मुंबईला न जाता टी. व्ही. वरच शपथविधी पहायचा होता. पण लाईट नसल्याने ते पाहता आलं नाही. आता लाईट आली, तर पाहू दे माज्या मुलाचा शपथविधी.’ मुंबईत कॅबिनेट मंत्री म्हणून प्रा. राम शिंदे यांचा शपथविधी सुरू असताना त्यांच्या चौंडी (ता. जामखेड, जि.अहमदनगर) येथील त्यांच्या घरी त्यांच्या मातु:श्री भामाबाई शिंदे ‘लोकमत’ला सांगत होत्या.
वृध्दापकाळ व आजारपणामुळे मुलाच्या शपथविधीस जाऊ न शकल्याने चौंडीच्या घरी मंत्री शिंदे यांचे वडील शंकर बापू शिंदे (वय ८०) व आई भामाबाई टी. व्ही. वर शपथविधी पाहण्यासाठी आतुरले होते. शपथविधी सुरू असताना वीज नव्हती. त्यामुळे त्यांना सोहळा पाहता आला नाही. दुपारी गप्पा मारता मारता म्हटलं, आता लाईट आहे, तर लावा बरं टी. व्ही...काही वेळाने बातम्या सुरू झाल्या.
काही सेकंदासाठी शपथ घेताना मुलगा दिसताच आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. भामाबार्इंचं तीन वर्षांपूर्वी तर शंकररावांच्याही गुडघ्याचं वर्षापूर्वी आॅपरेशन झालं.
मुलगा मोठा झाला, पण गावाकडची सवय झाली. इथं चार एकर शेती हाये. ती पावसावर अवलंबून आहे. चार वर्षापासून पिकच नाही. त्यांना मुलाला शेतीचं खातं मिळणार असल्याचं सांगितल्यावर ‘माझा राम शेतकऱ्यांसाठी खूप काही करील’ असं भावनिक होऊन भामाबाई म्हणाल्या.
२५ वर्षे साल घालून मुलाला शिकवलं. त्याने आमचं पांग फेडलं. मोठ्या हुद्द्यावर पोहचला, असं म्हणताना वडील शंकर शिंदे यांना आनंदाच्या भावना अनावर झाल्या होत्या.
आई वडिलाबरोबर चौंडी गावाने फटाके व पेढे वाटून गावाने आनंदोत्सव साजरा केला. गावातील प्रमुख कार्यकर्ते मुंबईला शपथविधीला गेल्याचे गावातील दुकानदारांनी सांगितले.
टीव्हीवर शपथविधी पहा असं त्यानं सांगितलं
‘दीड वर्षापूर्वी शपथविधीला गेलो होतो. रात्री साडेअकराला फोन आला होता. मला मोठं पद मिळालंय. आजारी असल्याने तुम्ही टी. व्ही. वर शपथविधी पहा, असं त्याने सांगितलं. पण लाईट नव्हती. दहाला लाईट आली. पण आम्हाला टी. व्ही. लावता येत नाही. गावातून पोरांना बोलावलं. पण बातम्या दिसत नाही’, भामाबाई डोळ्यात आनंदाश्रू आणत सांगत होत्या.

Web Title: Cabinet Minister of a Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.