कोट्यवधींची ‘अक्षय्य’ खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 23:47 IST2016-05-09T23:20:43+5:302016-05-09T23:47:46+5:30
अहमदनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केलेली खरेदी वृद्धिंगत होणारी असते, अशी भावना असल्याने ‘अक्षय्य’ खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली.

कोट्यवधींची ‘अक्षय्य’ खरेदी
अहमदनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केलेली खरेदी वृद्धिंगत होणारी असते, अशी भावना असल्याने ‘अक्षय्य’ खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. ‘अक्षय्य’ खरेदीमुळे बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले. कोट्यवधी रुपयांच्या खरेदीने व्यापारी वर्ग सुखावला असल्याचे चित्र सायंकाळी दिसले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक, सराफ, वाहन बाजारात विविध योजना व्यापाऱ्यांनी जाहीर केल्या होत्या. मुहूर्ताच्या दिवशी बाजारपेठ ग्राहकांना हवं ते देण्यासाठी सज्ज होती. सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी सुरू झाली. सायंकाळी गर्दीने उच्चांक केला. सराफी दुकाने दोन महिन्यांच्या संपानंतर सुरू झाल्याने ग्राहकांनी सोने खरेदीला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे चित्र होते. पंधरा दिवसांपूर्वी असलेला २९ हजार रुपये प्रतितोळा भाव अक्षय्य तृतीयेला ३० हजारांवर पोहोचला होता, तरीही नागरिकांनी कुवतीनुसार सोने खरेदी केले. वाहन बाजारात अगोदर बुकिंग केलेले दुचाकी व चारचाकी वाहन ग्राहकांनी मुहूर्तावर घरी नेले. इलेक्ट्रॉनिक बाजारातही ग्राहकांची गर्दी झाली होती. बिल्डरांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृह प्रकल्पाचा नारळ फोडला. नवीन गृहप्रकल्पात बुकिंगसाठीही अनेक बांधकाम व्यावसायिकांनी योजना जाहीर केल्या होत्या. अक्षय्य खरेदीच्या मुहूर्तावर नवीन घरांचे बुकिंग करून नागरिकांनी अक्षय्य तृतीयेचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)