ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:45+5:302020-12-15T04:36:45+5:30
कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बंद असलेल्या एस. टी. महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू करावी, ...

ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात
कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बंद असलेल्या एस. टी. महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी वारी ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल टेके यांनी कोपरगाव आगाराचे व्यवस्थापक अभिजित चौधरी यांच्याकडे सोमवारी (दि.१४) निवेदनाद्वारे केली आहे.
टेके म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एस. टी. महामंडळाच्या बससेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, मागील काळात तालुक्यातील काही गावांच्या बसेस सुरूही करण्यात आल्या आहेत. परंतु पूर्वभागातील वारी, कान्हेगाव, सडे, खोपडी, भोजडे, तळेगाव मळे, धोत्रे, गोधेगाव, दहिगाव बोलका, संवत्सर आदी गावांतील बसेस आजतागायत बंद आहेत. त्यामुळे या गावातील विविध पेन्शनधारक, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय उपचारासाठी कोपरगाव शहरात जाणारे नागरिक, शेतकरी, कष्टकरी, ज्यांच्याकडे स्वतःचे साधन नाहीत, अशा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या गावातील बसफेऱ्या पूर्ववत सुरु करून अशा नागरिकांना दिलासा द्यावा, असेही टेके यांनी निवेदनात म्हटले आहे.