बंधारे, नाल्यांना पाणी
By Admin | Updated: June 23, 2016 01:20 IST2016-06-23T00:40:28+5:302016-06-23T01:20:51+5:30
शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील चापडगाव, राक्षी, वाडगाव, थाटे, आखेगाव, खरडगाव, आव्हाणे, चापडगाव आदी परिसरात सोमवारी रात्री

बंधारे, नाल्यांना पाणी
शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील चापडगाव, राक्षी, वाडगाव, थाटे, आखेगाव, खरडगाव, आव्हाणे, चापडगाव आदी परिसरात सोमवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप पेरण्यांसाठी आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले तरी गेल्या ४ वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीसह अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणास बळकटी मिळावी यासाठी मोठ्या पावसाची गरज व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात शेवगाव मंडळात ४९ मि. मी, भातकुडगाव ३१ मि.मी., एरंडगाव ३५ मि.मी., चापडगाव ६२ मि.मी. तर बोधेगाव मंडळात ११ मि.मी. तर ढोरजळगाव मंडळात केवळ ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चापडगाव व शेवगाव परिसरात दमदार पावसामुळे बंधारे, ओढे, नाल्यांना चांगले पाणी आले असून, पहिल्याच पावसाने अनेक बंधारे भरल्याचे सांगण्यात आले. वरूर बंधाऱ्यातील जवळपास ४ लोखंडी गेट वाहून गेल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.
तालुक्यातील अनेक भागात सुरू असलेल्या पावसामुळे आता खरीप पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. खरीप पेरण्यांसाठी बियाणे व खते उपलब्ध व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली आहे. यंदा तूर, मुगाच्या क्षेत्रात वाढ होण्याची माहिती कृषी कार्यालयातून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)