काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली
By Admin | Updated: June 16, 2014 00:11 IST2014-06-15T23:50:38+5:302014-06-16T00:11:59+5:30
अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा सुरू असताना सभागृहाबाहेर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून
काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली
अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा सुरू असताना सभागृहाबाहेर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून त्यामधून एक गोळी सुटली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र सभास्थळी झालेल्या या प्रकारामुळे एकच पळापळ झाली. या प्रकरणी संभाजी देवराम रोहोकले (वय ६१, रा. भाळवणी, ता. पारनेर) यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहोकले यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात रविवारी दुपारी श्रद्धांजली सभा सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. श्रद्धांजली सभा सुरू असताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे भाषण संपल्यानंतर ते दुपारी दीडच्या सुमारास सभागृहाबाहेर येत होते. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संभाजी रोहोकले हे विखे यांना भेटण्यासाठी सभागृहाबाहेर निघाले. यावेळी रोहोकले हे त्यांची पॅन्ट सावरत असताना कमरेच्या डाव्या बाजूला बेल्टला लावलेले आणि (पान ७)
लोडेड असलेले रिव्हॉल्व्हर पाऊचमधून अचानकपणे फरशीवर पडले. त्यामधून एक गोळी सुटली आणि ती सभागृहाबाहेरील पोर्चच्या छताला लागली. सुदैवाने ही गोळी स्वत: रोहोकले यांना आणि पोर्चमध्ये थांबलेल्या कोणालाही लागली नाही. मात्र श्रद्धांजली सभा सुरू असताना सभागृहाबाहेर स्फोटासारखा आवाज आला. त्यामुळे सभागृहातील लोक घाबरून पळू लागले. एकच गोंधळ उडाला. प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रोहोकले यांना सावरले तेंव्हा रोहोकले हे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांची चौकशी करून त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सभागृहाबाहेर असलेला गोंधळ कमी झाला.
रोहोकले यांनी बाळगलेले रिव्हॉल्वर हे २००६ चे परवानाधारक असून ते त्यांनी अंबरनाथ येथून खरेदी केले होते. स्वसंरक्षणार्थ त्यांनी ते बाळगले होते. नेहमीच सहा राऊंड लोड करून ते वापरतात. श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी येतानाही ते नेहमीप्रमाणे सहा राऊंड लोड करून सभागृहात आले होते. रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर झाला होता. रोहोकले यांच्याकडील रिव्हॉल्वर आणि पाच राऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
निष्काळजीपणा भोवला
शासनाने परवाना दिल्यानंतर शस्त्राची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र रोहोकले यांनी शस्त्र वापरताना कोणतीही काळजी घेतलेली नाही. लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल,याची काळजी घेतलेली नाही. रिव्हॉल्वर हयगयीने वापरल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब निवृत्ती गडाख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रोहोकले यांच्याविरुद्ध भादंवि कलम २८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, नितीन पगार, भरत जाधव, कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
असे आहे रिव्हॉल्व्हर
रिव्हॉल्वरचा क्रमांक एनपीएपीएफ ३२ इंच, एमके-१ क्रमांक २९४४१०५ असा आहे. सहा बोअरचे ते रिव्हॉल्व्हर आहे. शासन परवाना क्रमांक २७५/पारनेर असा आहे.
हे रिव्हॉल्वर त्यांनी अंबरनाथ येथून २००६ मध्ये खरेदी केले आहे. रिव्हॉल्वरची देखभाल केली जात नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.