तांदळीत आहे बैलांचाही देव
By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T23:04:18+5:302014-08-24T23:08:51+5:30
तांदळी (वडगाव) येथील धर्मनाथ मंदिर राज्यातील एकमेव असे मंदिर आहे की, तेथे बैलांना व इतर जनावरांना दर्शनासाठी नेण्याची प्राचीन प्रथा आहे.

तांदळीत आहे बैलांचाही देव
अहमदनगर : माणसं कशी मंदिरात जातात, दर्शन करतात, देवाला काहीतरी मागतात. काय मग जनावरांचा पण देव असतो का? त्यांना दर्शनासाठी मंदिर असते का? अशा मंदिरात बैल व इतर जनावरे जाऊन देवाचा अंगारा लावतात का? या देवाच्या दर्शनाने खरच बैल व इतर जनावरांना गुण येतो अशी श्रद्धा असू शकते का? नाही ना खरं वाटत, पण हे खरे आहे बैलांचाही देव आहे, त्या देवाचे मंदिर आहे. तांदळी (वडगाव) येथील धर्मनाथ मंदिर राज्यातील एकमेव असे मंदिर आहे की, तेथे बैलांना व इतर जनावरांना दर्शनासाठी नेण्याची प्राचीन प्रथा आहे.
नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील धर्मनाथांचे मंदिर जनावरांचे मंदिर म्हणून जास्त कुणाला माहिती नसले तरी या गावाच्या आसपासच्या दहा-पंधरा गावातील बैल व इतर जनावरांसाठी धर्मनाथ मंदिर हेच त्यांचे मंदिर आहे. नाथसंप्रदायातील धर्मनाथांचे समाधीस्थळ म्हणजेच हे मंदिर होय. या मंदिराची उभारणी प्राचीन काळातील असली तरी तांदळी व इतर आसपासच्या गावांची या दैवतावर अजूनही प्रचंड श्रद्धा
आहे.
धर्मनाथांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली असे गावकरी सांगतात. धर्मनाथांची धर्मनाथ बीज माघ महिन्यातील द्वितीयेला साजरी करतात. (तालुका प्रतिनिधी)
उत्सवात होते बैलांची गर्दी
श्रावण महिन्यातील शनिवारी धर्मनाथ उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तांदळी व इतर आसपासच्या दहा-पंधरा गावातील बैल व इतर पाळीव जनावरांना धर्मनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गावकरी आवर्जून घेऊन येतात. यात्रेच्या या दिवशी बैल व इतर जनावरांची मोठी गर्दी होते. मंदिराची प्रदक्षिणा करून मंदिरातील अंगारा बैलांना व इतर जनावरांना लावला जातो. पुजारी बैल व गायींच्या गळ्यात गाठी बांधतात, ही गाठी बांधल्यामुळे ते आजारी पडत नाहीत, अशी या मागची श्रद्धा आहे. इतकेच नाही एखादा बैल आजारी असेल, गाय दूध देत नसेल तरी या मंदिरातील अंगारा गुणकारी ठरतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आजारी असलेल्या बैलांना व गायींना हे मंदिर गुणकारी असल्याने शेतकरी येथे आवर्जून येऊन येथील अंगारा जनावरांना लावतात. ही प्रथा आजही सुरू आहे.