मुंबईत सरपंच भवन उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:07+5:302021-07-01T04:16:07+5:30
सुपा : मुंबईत सरपंच भवन उभारण्यासह ग्रामविकासातील अडचणींबाबत राज्य सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा झाली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद ...

मुंबईत सरपंच भवन उभारा
सुपा : मुंबईत सरपंच भवन उभारण्यासह ग्रामविकासातील अडचणींबाबत राज्य सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा झाली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षा तथा पारनेर तालुक्यातील पिंप्री गवळी येथील सरपंच अश्विनी थोरात यांनी दिली.
निरंतर ग्रामविकासानेच स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु, आता या ग्रामविकासातच अडथळे निर्माण होत असल्याने हे अडथळे दूर करण्यासाठी थेट राज्यपालांनाच साकडे घालून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न परिषदेने केला असल्याचे थोरात यांनी सांगितले. केंद्राकडून ग्रामपंचायतींना निधी प्राप्त होतो. राज्य सरकारकडून कोविड काळात अडचणी वाढलेल्या असतानाही कुठलाही निधी मिळाला नाही. उलट मिळालेल्या निधीच्या रकमेतून या ना त्या कारणाने निधी परत घेतल्याने विकासाला खीळ बसल्याचे सरपंच परिषदेचे म्हणणे आहे. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून गावपातळीवर काम करणाऱ्या ३५ सरपंचांना जीव गमवावा लागला. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सरपंच परिषदेने केली. मुंबईत सरपंच भवन उभे करावे, ग्रामविकासासाठी आलेला सर्व निधी गावच्या विकास योजनासाठीच खर्च करावा, आदी मागण्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्षा अश्विनी थोरात, सचिव आनंद जाधव राजभवनात भेट घेऊन चर्चा केली.
---
३० सुपा
मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा झाल्यावर त्यांना निवेदन देताना राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्षा अश्विनी थोरात, पदाधिकारी, प्रतिनिधी सरपंच.