महिलांकडून दारूअड्डा उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 30, 2014 00:34 IST2014-06-29T23:27:41+5:302014-06-30T00:34:49+5:30
पारनेर : तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागात मांडओहोळ धरणानजीक असलेला सुमारे एक हजार लिटर दारूसाठा वारणवाडीतील संतप्त महिलांनी शनिवारी उद्ध्वस्त केला.
महिलांकडून दारूअड्डा उद्ध्वस्त
पारनेर : तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागात मांडओहोळ धरणानजीक असलेला सुमारे एक हजार लिटर दारूसाठा वारणवाडीतील संतप्त महिलांनी शनिवारी उद्ध्वस्त केला. टाकळीढोकेश्वर पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आक्रमक होत महिलांनी केलेल्या या धाडसाचे स्वागत होत आहे.
मांडओहोळ धरणाच्या पलिकडे वारणवाडी हे दुर्गम गाव आहे. गावामध्ये महिला व ग्रामपंचायतीने यापूर्वीच दारूबंदी केली आहे. तरीही गावासह परिसरात दारूविक्री होत होती. यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने महिलाही त्रस्त होत्या. मांडओहोळ नदी पात्रालगत दारूविके्रत्यांनी दारू अड्डा बनविला होता. याची माहिती महिलांना मिळाली होती. टाकळीढोकेश्वर पोलिसांकडे महिनाभरापूूर्वीच तक्रारी केल्या होत्या.
शनिवारी सकाळीच महिलांनी बैठक घेतली. सरपंच कारभारी आहेर, उपसरपंच विजय गुंड, कोंडीभाऊ केदार यांच्यासह अनेक महिला बैठकीसह हजर होत्या. दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसेल तर आपण स्वत:च जाऊन ते उद्ध्वस्त करू, असे म्हणून हौसाबाई मधे, सुमन मधे, राधाबाई केदार, कमल केदार, ताराबाई मधे, आशा मधे, मनिषा मधे यांच्यासह युवक महिलांनी बैठकीतून उठून दारूअडडा गाठला. तेथे मोठे बॅरल भरून दारूसाठा व साहित्य होते. महिलांनी यातील सुमारे एक हजार लीटर दारू उद्ध्वस्त केली. महिलांच्या या आक्रमकतेने दारू विक्रेत्यांना पळ काढावा लागला.
(तालुका प्रतिनिधी)
पोलिसांना बांगड्यांचा आहेर
टाकळीढोकेश्वर पोलिसांकडे वारणवाडीतील महिला व ग्रामस्थांनी वेळोवेळी दारूबंदीची मागणी केली होती, परंतु कार्यवाही झाली नाही. पोलिसांच्या या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पोलिसांना बांगड्यांचा आहेर देण्याच्या पवित्र्यात महिला आहेत.