जनावरे वर्षा बंगल्यावर नेऊन बांधा : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:28 IST2018-12-06T14:28:02+5:302018-12-06T14:28:05+5:30
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत

जनावरे वर्षा बंगल्यावर नेऊन बांधा : बाळासाहेब थोरात
अहमदनगर : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. त्यांच्या वर्षा बंगल्यावर जनवारे नेऊन बांधावेत. तिथे जनवारांच्या चारा पाण्याची सोय उत्तम होईल, असा टोला काँग्रेसचे माजीमंत्री तथा बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना आज पत्रकार परिषदेत लगावला.
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे चारा पाणी नसेल तर, जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घाला, असा अजब सल्ला चारा छाणवीवर बोलताना दिला़ पालकमंत्री शिंदे यांच्या विधानाचे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसचे माजीमंत्री थोरात नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पालकमंत्री शिंदे यांच्या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता थोरात यांनी शिंदे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे़ सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतक-यांना मिळालेली नाही. केंद्राच्या पथकांकडून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची पाहणी सुरू आहे. जिल्ह्यातील जनवारांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वत्र दुष्काळ असल्याने आता कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही़ एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनवारे नेऊन बांधा, अशी टिका थोरात यांनी यावेळी केला.