पोलीस कर्मचाऱ्यांची लाचखोरी पोलीस निरीक्षकांना भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:56+5:302020-12-16T04:35:56+5:30
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची जिल्हा पोलीस ...

पोलीस कर्मचाऱ्यांची लाचखोरी पोलीस निरीक्षकांना भोवली
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी मंगळवारी (दि. १५) पत्रकारांशी बोलताना सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून यापुढे लाचेचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी दिला होता.
पोलीस नाईक देशमुख याला संगमनेर शहर पोलीस ठाण्यातच एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. १२) रंगेहाथ पकडले होते. एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक देशमुख याच्याकडे होता. तक्रार देणाऱ्या व्यक्तीची पत्नी मिळून आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार बंद केल्याने देशमुख याने संबंधित व्यक्तीकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर हा सापळा रचला होता. तसेच तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार वाघ याला सोमवारी (दि. १४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार यांच्या भाचीने तिच्या कौटुंबिक वादाच्या कारणास्तव सासरच्या लोकांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये दोन्ही कुटुंबांत तडजोड करून दिल्याच्या मोबदल्यात वाघ याने दहा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर हा सापळ रचला होता. पोलीस कर्मचाऱ्यांची लाचखोरी पोलीस निरीक्षकांना भोवल्याची चर्चा संगमनेर, अकोले तालुक्यात सुरू आहे.