कावडीधारकांनी नियम मोडल्याने महिलांना चौथरा खुला
By Admin | Updated: April 9, 2016 00:31 IST2016-04-09T00:22:18+5:302016-04-09T00:31:29+5:30
अहमदनगर : शुक्रवारी कावडीधारकांनी चौथऱ्यावर जात शिळेला जलाभिषेक केला. त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांना स्त्री-पुरुष अशा दोघांसाठीही चौथरा खुला करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कावडीधारकांनी नियम मोडल्याने महिलांना चौथरा खुला
अहमदनगर : शनी चौथऱ्याचा प्रवेश पुरुषांसाठीही बंद असताना शुक्रवारी कावडीधारकांनी चौथऱ्यावर जात शिळेला जलाभिषेक केला. त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांना स्त्री-पुरुष अशा दोघांसाठीही चौथरा खुला करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या धाडसी निर्णयातून देवस्थानने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.
शिंगणापूर चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचे मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवलही केले गेले. राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी याविषयी थेट यशवंतराव गडाख यांच्यावर टीका केली होती. मात्र, हा निर्णय घेणे हे गडाख यांच्यासाठीही सहजसोपे नव्हते. कारण देवस्थानच्या विरुद्ध स्थानिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर राजकारण पेटविले गेले. नेवासा हा वारकरी संप्रदायाला मानणारा तालुका आहे. विद्यमान भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे हे वारकरी आहेत. ‘जय हरी’ ही त्यांची निवडणुकीतील घोषणाच होती. मात्र, आमदार मुरकुटे यांनी याप्रश्नी भूमिका घेतली नाही. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आध्यात्मिक क्षेत्राला या विषयावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. देवस्थान बचाव कृती समितीही प्रथा मोडण्यास विरोध करत होती. त्यामुळे महिला प्रवेशाचा निर्णय कशाच्या जोरावर घ्यायचा हा देवस्थान ट्रस्टसमोरही मोठा प्रश्न होता. त्यामुळेच स्त्री-पुरुष या दोघांनाही बंदी या विषयावर विश्वस्त ठाम होते. मात्र, कावडीधारकांनी हा नियम पाळला नाही. त्यामुळे देवस्थानलाही नाईलाजास्तव महिला प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला.
महिला अध्यक्षांच्या कार्यकाळातील धाडसी निर्णय
शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये या वर्षी प्रथमच अनिता शेटे व शालिनी लांडे या महिलांची निवड केली. अध्यक्षपदी शेटे यांची नियुक्ती करण्यात आली. आता महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याने स्त्री-पुरुष समानतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. नेवासा तालुक्यात यशवंतराव गडाख यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करताना कारखान्याचा पहिला शेअर्स एका महिलेच्या नावाने काढला होता.
देवस्थानने घेतलेले निर्णय
२०११ : ओल्या वस्त्रांनिशी
भाविकांच्या दर्शनाची प्रथा बंद केली.
जानेवारी २०१६ : पुरुषांच्या हस्ते शनी चौथऱ्यावर आरती होत होती. या आरतीसाठी ११ हजार रुपये शुल्क आकारले जात होते. ती प्रथा बंद केली.
देसार्इंच्या दर्शनावेळी ग्रामस्थांची अनुपस्थिती
शनि चौथरा महिलांना खुला झाल्यानंतरही गावातील महिलांनी पहिल्या दिवशी चौथऱ्यावर प्रवेश केला नाही़ तृप्ती देसाई यांनी चौथरा प्रवेश केला त्यावेळी स्थानिक महिला, गावकरी व विश्वस्त अनुपस्थित होते़ परगावच्या भाविकांनी मात्र, दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ या निर्णयाने शिंगणापुरातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे़