सुपा औद्योगिक पार्कच्या विस्तारीकरणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:35+5:302021-06-16T04:28:35+5:30
अहमदनगर : सुपा औद्योगिक वसाहतीतील टप्पा एकमध्ये जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. जमिनीही प्रशासनाच्या ताब्यात आल्या. परंतु, केवळ १०५ ...

सुपा औद्योगिक पार्कच्या विस्तारीकरणाला ब्रेक
अहमदनगर : सुपा औद्योगिक वसाहतीतील टप्पा एकमध्ये जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. जमिनीही प्रशासनाच्या ताब्यात आल्या. परंतु, केवळ १०५ हेक्टरवर जमीन कारखान्यांसाठी वाटप करण्यात आले असून, उर्विरत भूखंड रिकामे आहेत. त्यामुळे जमीनही गेली आणि उद्योगही नाहीत, अशी परिस्थिती आहे.
नगर जिल्ह्यात नागपूरसह सुपा, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी आदी ठिकाणे औद्योगिक वसाहतीत आहेत. सुपा औद्योगिक वसाहत नव्याने विकसित करण्यात आली आहे. जुन्या औद्याेगिक वसाहतीत उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे या भागात नव्याने औद्योगिक पार्क उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या पार्कचे एकूण तीन टप्पे आहेत. तीन टप्प्यातील ९३४ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ५८० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध आहे. याशिवाय वडगाव गुप्ता येथील भूसंपादनही अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील नवीन उद्योग सुरू झालेले नाहीत. नवीन सुपा औद्योगिक वसाहतीतील पहिल्या टप्प्यातील १७ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित ८५३ भूखंड रिकामे आहेत. नेवासा व श्रीरामपूर येथेही काही भूखंड रिकामे आहेत. या भूखंडांवरही नवीन उद्योग सुरू झालेले नाहीत. रिकामे असलेले भूखंड वाटप करण्यासाठीची प्रक्रियाही प्रशासनाकडून राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हे भूखंड उद्योगांविना पडून आहेत. त्यामुळे उद्योग तर सुरू झाले नाहीच. पण रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. मात्र नवीन उद्योग न आल्यामुळे या जमिनी पडून आहेत.
...
आधिग्रहण न झालेल्या जमिनी
- टप्पा-२- २३७ हेक्टर
टप्पा- ३- ८३८ हेक्टर
वडगावगुप्ता- ४६१ हेक्टर
........
प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित भूखंडांचे वाटप सुरू
सुपा औद्योगिक पार्क येथे ५७५ भूखंड प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव आहेत. हे भूखंड वाटप करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. मागणीनुसार हे भूखंड वाटप केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
......
जपानी उद्योगांची पाठ
सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी कंपन्या सुरू करण्यात येणार आहेत. उद्योजकांनी भूखंडही घेतलेले आहेत. काही कारखाने सुरूही झाले आहेत. परंतु, बहुतांश जपानी उद्योजकांनी याकडे पाठ फिरविल्यामुळे नव्याने रोजगार उपलब्ध झालेला नाही. वर्षानुवर्षे जागा रिकाम्या पडून आहेत. अधिग्रहण झालेल्या जमिनीत उद्योग सुरू होत नाहीत. त्यामुळे नवीन जमिनी घेऊन सरकार काय करणार आहे, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
....