शतायुषी मतदार आयोगाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 14:58 IST2018-12-25T14:58:19+5:302018-12-25T14:58:23+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील शंभरी पार केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

'Brand Ambassador' of Shatyushi Voter Commission | शतायुषी मतदार आयोगाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’

शतायुषी मतदार आयोगाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील शंभरी पार केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार ७८५ शतायुषी मतदार आढळले असून, त्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळी योग्य तो सन्मान देऊन त्या आधारे मतदार जागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे.
राज्य निवडणूक विभागाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा निवडणूक शाखेकडून आगामी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ज्या मतदारांचे वय शंभरपेक्षा जास्त आहे, अशा सर्व मतदारांची पडताळणी करून या मतदारांचे वय खरोखरच शंभर पेक्षा जास्त आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मतदारांची त्यांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येत आहे. आतापर्यंत यात २२३४ जणांचे वय शंभरी पार आढळले. परंतु खातरजमा केली असता प्रत्यक्षात ७८५जणांचे वय १०० पेक्षा जास्त आहे. यापैकी अनेकजण अजूनही धडधाकट आहेत. मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोग ज्याप्रमाणे विद्यार्थी, सेलिब्रिटींची मदत घेते, त्याप्रमाणे या शतायुषी मतदारांद्वारे मतदार जागृती करून त्यांनाही विशेष सन्मान मिळणार आहे. शंभरी पार केलेले मतदार जर मतदान करू शकत असतील तर इतरांना काय अडचण आहे, असा संदेश त्यातून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.
जिल्हा निवडणूक शाखेने केलेल्या या तत्पर सर्वेक्षणाचे नाशिक येथील बैठकीत प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी विशेष कौतुक केले. नगर जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांतही अशीच मोहीम राबवून शतायुषी मतदारांकरवी मतदार जागृती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शंभरपेक्षा जास्त वय असलेले सर्व मतदार हे लोकशाही प्रक्रियेतील पारतंत्र्य व स्वातंत्र्य या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जमा करुन या मतदारांना आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळी योग्य तो सन्मान देण्यात येईल. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

तरूणांचे जसे आयडॉल असतात, त्याप्रमाणे शंभरी पार केलेले मतदारही आयडॉल होऊ शकतात. या मोहिमेद्वारे शतायुषी मतदारांना लोकांसमोर येण्याची संधी मिळणार आहे. त्यांचा योग्य तो सन्मान जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात येईल. - अरूण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: 'Brand Ambassador' of Shatyushi Voter Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.