चितळे रस्त्यावर धनुष्य-घड्याळाची टक्कर

By Admin | Updated: July 10, 2016 00:36 IST2016-07-10T00:30:27+5:302016-07-10T00:36:07+5:30

अहमदनगर : चितळे रोड म्हणजे शिवसेनेचा किल्लाच! या रस्त्यावर माजी आमदार अनिल राठोड यांचे एकहाती वर्चस्व!

Bows-clock collision on Chitale road | चितळे रस्त्यावर धनुष्य-घड्याळाची टक्कर

चितळे रस्त्यावर धनुष्य-घड्याळाची टक्कर

अहमदनगर : चितळे रोड म्हणजे शिवसेनेचा किल्लाच! या रस्त्यावर माजी आमदार अनिल राठोड यांचे एकहाती वर्चस्व! नेता सुभाष चौकात शिवसेनेचे कार्यालय असल्याने गेल्या २५ वर्षातील शिवसेनेच्या राजकीय घडामोडींचा हा रस्ता एक साक्षीदारच म्हणावा लागेल. शिवसेना आणि चितळे रस्ता म्हणजे एक समीकरण झाले होते. मात्र ही परंपरा आता मोडीत निघणार आहे. कारण आता याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू होत असल्याने आगामी काळातील राजकीय संघर्ष चांगलाच रंगणार आहे.
राजकीय वाद असोत की आनंदाचे मेळावे, त्याची चितळे रोडवरूनच सुरवात होते. त्यामुळे शिवसेना आणि चितळे रोड हे एक समीकरणच बनले होते. गेल्या २५ वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाच्या मनात या रस्त्यावर कार्यालय थाटण्याचा विचार आला नाही. मात्र लोकसंपर्कासाठी चितळे रोडशिवाय दुसरा चांगला रस्ता कोणताही नाही, याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना आली असावी. त्यांनी नेहरु मार्केटच्या बाजुला जनसंपर्क कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या कार्यालयाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. वेळ मिळाल्यास दणक्यात या कार्यालयाचे उद्घाटन होईल. पूर्वी शिवसेनेत काम करणारे संजय झिंजे, दीपक सूळ, अंबादास पंधाडे असे कितीतरी कार्यकर्ते सध्या जगताप यांच्या तंबूत आहे. त्यांच्या मदतीनेच ही कार्यालयाची संकल्पना साकार झाली. आगामी विधानसभेची जोरदार तयारी करण्यासाठी त्यांनी हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले, यात शंकाच नाही. मात्र त्यांच्या कार्यालयामुळे आता चितळे रोडवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. दोन्ही पारंपरिक विरोधकांची कार्यालये एकाच रस्त्यावर आल्याने राजकीय संघर्ष धगधगता राहणार आहे.
चितळे रोडवर नवीन कार्यालयाचे काम सध्या सुरू आहे. एक-दोन दिवसात कार्यालयाचे काम पूर्ण होईल. अधिवेशन काळात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची वेळ मिळाली तर त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. चितळे रोड हा मध्यवर्ती भाग असल्याने लोकांच्या सोयीसाठी चितळे रोडवर संपर्क कार्यालय सुरू केले आहे. लोकप्रतिनिधीला भेटणे लोकांना सोपे व्हावे, हाच उद्देश कार्यालय सुरू करण्यामागे आहे.
- संग्राम जगताप, आमदार

Web Title: Bows-clock collision on Chitale road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.