शौचालय योजनेत बोगस लाभार्थी
By Admin | Updated: June 30, 2016 01:21 IST2016-06-30T01:14:43+5:302016-06-30T01:21:27+5:30
श्रीरामपूर : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांर्तगत नगरपालिकेने निधी दिला. परंतु अनेक लाभार्थ्यांनी जुनेच शौचालये दाखवून हा निधी लाटला.

शौचालय योजनेत बोगस लाभार्थी
श्रीरामपूर : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांर्तगत नगरपालिकेने निधी दिला. परंतु अनेक लाभार्थ्यांनी जुनेच शौचालये दाखवून हा निधी लाटला. यावर पालिकेने काय कार्यवाही केली, असा जाब विरोधी नगरसेविका भारती कांबळे यांनी पालिका सर्वसाधारण सभेत विचारला. नगरसेवकांनी गैरव्यवहार झालेल्या अनुदानाबाबत माहिती दिली असती, तर कारवाई केली असती, असा खुलासा नंतर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी केला.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी व्यासपीठावर होते. मुख्याधिकारी मोरे सभागृहास माहिती देताना म्हणाले, स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधकाम योजनेत ३ हजार १६ नागरिकांनी अर्ज दाखल केले. त्यात मंजूर झालेल्या १ हजार ८८१ अर्जापैकी १ हजार ८२० नागरिकांना प्रथम टप्यातील अनुदान देण्यात आले. अनुदान रकमेचा गैरवापर करणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी अंजुम शेख यांनी केली. त्यावर नगरपालिकेची कार्यवाही सुरु आहे. ज्यांनी गैरवापर केला त्यांना फौजदारी गुन्ह्याची नोटीसा देऊन कारवाई करण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले. तसेच उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात येईल, असे नमूद केले.
अंजुम शेख व नगरसेवक श्याम आडागळे यांनी १२ हजारात शौचालयाचे काम होत नाही. त्याला आणखी ३ हजार जादा अनुदान द्यावे, अशी मागणी करत शेख यांनी आपण प्रभागात लोकांना वैयक्तिक ३ हजार रुपये दिल्याचे सांगितले.
सभेत नगरसेवक संजय छल्लारे यांनी सभागृहाचे लक्ष वेगळ्या विषयाकडे वळविले. विरोधी नगरसेविकेच्या प्रश्नास बगल देत ते म्हणाले, आरोप तर होतच राहतात. परंतु सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर चर्चा का होत नाही. नगरपालिकेने जल पुनर्भरण कार्यक्रम हाती घेतला आहे.
शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व नगरपालिकेच्या अन्य मालमत्तांमध्ये ही योजना राबवावी, नगरपालिकेने पत्र देऊन बैठकीच्या माध्यमातून जागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. पक्षप्रतोद संजय फंड यांनी त्यास अनुमोदन दिले.
शहरातून वाळूची अवैध वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघात, तसेच रस्ते खराब होतात. त्यासाठी या वाहतुकीला पर्यायी मार्ग सूचवा, अशी सूचना संजय फंड यांनी केली.
विरोधी नगरसेविका भारती कांबळे व मंजुश्री मुरकुटे यांनी मुख्याधिकारी पत्रकारांना एक व सभागृहात एक माहिती देतात, असा आरोप केला. त्याबद्दल मुरकुटे नगराध्यक्षांच्या परवानगीने बोलण्यास उभ्या राहिल्या असता त्यांना अन्य नगरसेवकांनी बोलू न दिल्याने त्या संतप्त झाल्या. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी विरोधकांना शांत करत विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याचे सांगितले. नगराध्यक्षा ससाणे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. (वार्ताहर)
कल्याण मंडप विद्युतीकरणाचा विषय सभागृहात गाजला. मुख्याधिकारी मोरे म्हणाले, आतील कामाचा ठेका दिला असून बाहेरील कामाची निविदा तांत्रिक कारणाने निघाली नाही. त्यामुळे पालिकेच्या निधीतून ३४ हजार ३६७ रुपयांचे गॅलरी व बाहेरील काम केले. निवडणुकीपूर्वी कल्याण मंडपाचे उद्घाटन करावे, अशी सूचना अंजुम शेख यांनी केली.
---------------------------------------------------
मुरकुटे संतप्त
सभा संपल्यानंतर नगरसेविका मंजुश्री मुरकुटे व मुख्याधिकारी मोरे यांच्यात वाद झाले. विरोधकांनी अभ्यास करून बोलावे, असा उल्लेख करून आपणास सभेत बोलू दिले नाही असा आरोप मुरकुटे यांनी केला.