पाण्यात मृत जनावरांची हाडे
By Admin | Updated: March 19, 2016 00:09 IST2016-03-19T00:06:34+5:302016-03-19T00:09:11+5:30
मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो.

पाण्यात मृत जनावरांची हाडे
मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूर
पिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो. नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे फाटा फुटतो़ तेथून संजयनगरकडे जाणाऱ्या साई रेल्वे भुयारी मार्गापर्यंत पाटाची स्थिती थोडी बरी आढळली़ पुढे सुखदा हौसिंग व अहिल्यादेवीनगरमध्ये पाण्याचा नाही तर कचऱ्याचाच पाट वाहतो़ या पाण्यात मृत जनावरांची हाडे, चिंध्या, केरकचरा अशी घाण वाहताना आढळून आली़
नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे जाणाऱ्या पाटाचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशन केले़ श्रीरामपूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या साठवण तलावात पाटाद्वारे पाणी सोडलेले आहे़ मात्र, या पाटातच मृत जनावरे, केर कचरा टाकला जात असल्याचे वास्तव या स्टींग आॅपरेशनमधून ‘लोकमत’ने उघडकीस आणले़ श्रीरामपूरकर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनची प्रक्रिया होऊन प्यायला मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रवास तुमचेही डोळे गरगरायला लावणारा आहे़
येत्या २ एप्रिलला निळवंडे धरणातून आवर्तन सुटणार आहे. प्रवरा डाव्या कालव्यातून येणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याने श्रीरामपूर नगरपालिकेचा साठवण तलाव भरला जाणार आहे. या पाटाची पाहणी शुक्रवारी केली़ तेव्हा प्रवरा कालवा हा पाण्याचा पाट नाही तर कचऱ्याचा पाट झाल्याचं दिसलं़ या पाटामधूनच तलावात पाणी सोडलं जातं. संजयनगरकडे जाणाऱ्या साई भुयारी पुलापासून ते गोंधवणी रस्त्यावरील पुलापर्यंत पाटात चिंध्या, ओवळ्या-सोवळ्याचे कपडे, केरकचरा ठिकठिकाणी दिसत होता. इमॅन्युएल चर्चच्या परिसरात गोपीनाथनगर व संजयनगरच्या घरांमधील मोऱ्यांचे घाण पाणी, सांडपाणी व इतर सांडपाणीही थेट पाटात सोडण्यात आलंय. त्यासाठी चर्चजवळच रस्ता खोदून खास पाईप टाकून गोपीनाथनगरच्या घरांमधील घाण पाणी पाटात सोडलं आहे. या घाणीमुळे अहिल्यादेवीनगरमधील पाटाच्या कडेला राहणारे नागरिक डासांमुळे त्रस्त आहेत. या काही घरांमधीलही मोऱ्यांचं पाणीही पाटातच जातं. याच पाटातून पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात जातं़
सहज वॉशिंग प्रोजेक्टसमोर ज्याठिकाणाहून पाटाचे पाणी साठवण तलावाकडे वळते, त्याजवळच मेलेलं जनावर पाटाच्या मधोमध पडलेलं. त्यावर कावळे तुटून पडले होते. प्रभाग २ मधील जलकुंभ भरणारी एक जलवाहिनी गोंधवणी-पुणतांबा रस्त्यावरील पुलाखालून जाणाऱ्या पाटातूनच जाते. या जलवाहिनीस कचरा, घाण पाण्याचा वेढा पडलेला आहे़ ही पाईपालईन फुटल्यास पाटातील ही घाण थेट पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात पोहोचण्याचा धोका नाकारता येत नाही़