पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा : कोपरगाव रेल्वेस्थानकावर तीन तास कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:23 IST2019-01-24T17:22:51+5:302019-01-24T17:23:38+5:30
पुण्याहून मनमाडच्या दिशेने निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी आला

पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा : कोपरगाव रेल्वेस्थानकावर तीन तास कसून तपासणी
कोपरगाव : पुण्याहून मनमाडच्या दिशेने निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी आला आणि पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. त्यांनी तत्काळ नगर पोलिसांशी संपर्क करून कोपरगाव रेल्वेस्थानकातच एक्स्प्रेसची तब्बल तीन तास कसून तपासणी केली.
पुण्यावरून निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक २२८४५/४६ ) ही कोपरगाव रेल्वे स्थानकावर दुपारी ३.३० वाजता थांबविण्यात आली. या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता़ त्यावेळी रेल्वे कोपरगावमधून चालली होती. तेथेच रेल्वे थांबवून पोलिसांनी तपासणीसाठी स्थानिक पोलिसांची मदत मागितली़ त्यानुसार शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह बॉम्ब शोधक पथक त्वरित कोपरगाव रेल्वे स्थानकावर गेले.
सुपर फास्ट एक्सप्रेसची बॉम्ब शोधक, श्वान पथकाने कसून तपासणी केली. मात्र या सुपर फास्टमध्ये कोणताही बॉम्ब, अन्य काही स्फोटके सापडले नसल्याने रेल्वे प्रशासनासह रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ही सुपरफास्ट एक्सप्रेस सायंकाळी ७ वाजता हटियाच्या दिशेने रवाना करण्यात आली. या बॉम्ब शोधक पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप कोष्टी, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. भिंगारदिवे, पोलीस नाईक डी. के. पूर्णाळे, पोलीस नाईक पी. एन. डोळसे, चालक शेख मोहम्मद आदी सहभागी होते. या बातमीमुळे कोपरगाव रेल्वेस्थानकाचे संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते.
सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या मागील दोन डब्यात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता़ त्यानुसार त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांची मदत मागितली़ त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, अन्य सहा अधिकारी व जवळपास शहर व तालुक्यातील ३५ कर्मचाऱ्यांसह बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथक घेऊन तातडीने कोपरगाव रेल्वे स्थानकात दाखल झालो. प्रथम मागील बारा डब्यातील सर्व प्रवासी उतरवून आतील व खालील बाजूने तपासणी करण्यात आली़ त्यानंतर उर्वरित दहा डबेही तपासण्यात आले़ मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही़