शेतात सापडलेल्या बॉम्बचा झाला स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:58+5:302021-05-01T04:18:58+5:30

मंदाबाई बाबासाहेब फुंदे व अक्षय साहेबराव मांडे असे स्फोटात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर परिसरातील चार ...

A bomb found in a field exploded | शेतात सापडलेल्या बॉम्बचा झाला स्फोट

शेतात सापडलेल्या बॉम्बचा झाला स्फोट

मंदाबाई बाबासाहेब फुंदे व अक्षय साहेबराव मांडे असे स्फोटात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर परिसरातील चार किलोमीटर अंतरावर आवाज गेला. हा बॉम्ब जुन्या काळातील असल्याने स्फोट झाला तेव्हा त्याचा भडका उडाला नाही. केवळ छरेरे उडून आवाज झाला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर राहणाऱ्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता.

बुधवारी सायंकाळी शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना हा बाॅम्ब गोळा सापडला. त्यांनी तो बाॅम्ब गोळा जवळच शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला. त्याने तो बाॅम्बगोळा जमिनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात अक्षय व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली तसेच परिसरात आणखी बॉम्ब आहेत का याचाही शोध घेतला. यावेळी इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.

.........

शेतात सापडणाऱ्या वस्तूंना ग्रामस्थांनी हात लावू नये

नारायणडोह येथे आढळून आलेला बॉम्ब हा जुन्या काळातील भूसुरुंग असण्याची शक्यता आहे. तपासणीसाठी बॉम्बशोधक पथकाने बॉम्बचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. शेतात काम करत असताना ग्रामस्थांना काही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली तर त्याला हात न लावता तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

Web Title: A bomb found in a field exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.