केंद्राबाहेर सापडल्या बोगस मतपत्रिका
By Admin | Updated: May 24, 2016 23:40 IST2016-05-24T23:32:28+5:302016-05-24T23:40:19+5:30
अहमदनगर : अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला.

केंद्राबाहेर सापडल्या बोगस मतपत्रिका
अहमदनगर : अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला. २५० मतपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष, चतुर्थ झोन व पंचम झोन प्रांतिय अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी रविवारी नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात मतदान झाले. सोमवारी दुपारी चार वाजता मतमोजणी प्रक्रिया संपली. यामध्ये जय जिनेंद्र ग्रुप पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी विजय मिळविला. दरम्यान, मंगळवारी दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्या. ही वार्ता मतदारांमध्ये पसरली. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन करेवाड यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने भेट दिली. प्रत्येक मतपत्रिका पोलिसांनी गोळा करून घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. डी. डी. खाबिया यांना पोलिसांनी पाचारण केले. मतपत्रिकांची संयुक्तपणे तपासणी केली. तपासणीअंती या मतपत्रिका बोगस असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मतपत्रिका सापडल्याची चर्चा सोशल मीडियाद्वारे जोरदार पसरली. (प्रतिनिधी)
निवडणुकीमध्ये जशा मतपत्रिका छापल्या होत्या, तशाच मतपत्रिका छापून, झेरॉक्स करून त्यावर शिक्का मारून त्या मतदान केंद्राबाहेर फेकण्यात आल्या. हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. मतदानासाठी एक लाख मतपत्रिका छापल्या होत्या. प्रत्येक मतपत्रिकेवर फुली असलेला शिक्का आणि त्यावर निवडणूक प्रक्रियेत असलेल्या प्रोसेडिंग आॅफिसरची स्वाक्षरी होती. सापडलेल्या मतपत्रिकांवर फक्त शिक्का होता आणि तो बनावट होता.
-अॅड. डी. डी. खाबिया,
निवडणूक अधिकारी
सापडलेल्या मतपत्रिका जप्त केल्या आहेत. त्या मतपत्रिकांचा निवडणूक प्रक्रियेशी कोणताही संबंध नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे दिसते आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
-सोमनाथ मालकर,
पोलीस निरीक्षक