सोनेवाडी शिवारात तरुणाचा खून

By Admin | Updated: May 5, 2015 14:53 IST2015-05-05T14:49:18+5:302015-05-05T14:53:55+5:30

तालुक्यातील सोनेवाडी परिसरात एका ३0 ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा खून करण्यात आला आहे.

The blood of the youth in Sonewadi Shivar | सोनेवाडी शिवारात तरुणाचा खून

सोनेवाडी शिवारात तरुणाचा खून

 अहमदनगर : तालुक्यातील सोनेवाडी परिसरात एका ३0 ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा खून करण्यात आला आहे. खून झाल्यानंतर तरुणाची ओळख पटणार नाही, यासाठी मृतदेहाच्या चेहर्‍यावर रासायनिक पदार्थ टाकून चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. अशा अवस्थेतील मृतदेह ग्रामस्थांना आढळून आल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी अज्ञात तरुण आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत अनोळखी मृतदेहाचा तपास लागला नव्हता.
सोनेवाडी शिवारात रानवारा सहल केंद्राच्याजवळील (केडगाव ते अकोळनेर जाणार्‍या रस्त्यालगत) एका शेतात रविवारी रात्री ९ वाजता काही ग्रामस्थांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच नगर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. 
मयताचा चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. सोनेवाडी येथील उपसरपंच गोरख दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. संबंधित इसमाचा खून करून व त्याची ओळख पटू नये, यासाठी चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला असावा. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

तरुणाचा खून करून मृतदेह शिवारात टाकला असावा. मृतदेहाच्या चेहर्‍यावर दाहक पदार्थ टाकून चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याचा आरोपीने प्रयत्न केला आहे. मयत इसमाचा पत्ता, अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. या मयताबाबत कोणाला माहिती असल्यास नगर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
- विनोद चव्हाण,
सहा. पोलीस निरीक्षक मयताचे वर्णन
मयत हा ३५ ते ४0 वर्षे वयाचा आहे. राखाडी रंगाचा लाल पट्टा असलेला शर्ट, पांढर्‍या रंगाचे बनियन, पायात बदामी रंगाची चप्पल, शरीराने मध्यम, रंगाने काळासावळा, चेहरा गोल, उंची १७0 सेमी असे मयताचे वर्णन आहे. डोक्याच्या डाव्या बाजुला हत्याराने घाव घातल्याने जबर जखमी होवून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर चेहर्‍यावर दाहक पदार्थ टाकण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The blood of the youth in Sonewadi Shivar