वयाच्या ४२ व्या वर्षात तब्बल ८५ वेळा रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:38+5:302021-07-17T04:17:38+5:30
अस्तगाव : रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. आयात देखील करता येत नाही. रक्त हे केवळ माणसाच्या शरीरात तयार ...

वयाच्या ४२ व्या वर्षात तब्बल ८५ वेळा रक्तदान
अस्तगाव : रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. आयात देखील करता येत नाही. रक्त हे केवळ माणसाच्या शरीरात तयार होत असल्याने एखाद्या व्यक्तीने रक्तदान केल्याशिवाय गरजू रुग्णाला रक्त उपलब्ध होऊ शकत नाही. ४२ वर्षांत तब्बल ८५ वेळा रक्तदान करणाऱ्या अवलियाचे नाव आहे विजय चांगदेव शिरसाठ. त्यांच्या या कामगिरीमुळे शिरसाठ यांचे कौतुक केले जात आहे.
विजय चांगदेव शिरसाठ यांनी वयाच्या ४२ व्या वर्षात गेल्या २२ वर्षांपासून दर तीन महिन्याला आजपर्यंत ८५ वेळेस रक्तदान केले आहे. शिरसाठ यांनी वयाच्या २० व्या वर्षांपासून रक्तदानास सुरुवात केली असून दर तीन महिन्याला रक्तदान केले जाते. वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात ५ वेळेस तर साईनाथ रक्तपेढी शिर्डी येथे तब्बल ८० वेळेस रक्तदान केले आहे. राहाता तालुक्यात त्यांची ए पॉझिटिव्ह रक्तदाते म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या रक्तदानामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले. प्रत्येकाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. २० ते २२ वर्षांत शिरसाठ यांनी ३० लिटर रक्तदान केले आहे.
..............
लोकमतची भव्य रक्तदान मोहीम सुरू आहे. हा चांगला उपक्रम आहे. दर तीन महिन्याला आपण रक्तदान केले पाहिजे. रक्तदान केल्याने आपले कोणतेही नुकसान न होता शरीरात नवीन रक्त तयार होते. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आपण कोणत्याही आजारावर आपण सहज मात करू शकतो .
- विजय शिरसाठ, रक्तदाता, श्री भागविता टायर्स
..................
तालुक्यातील केलवड गावातील युवक अनुराग फटांगरे यांनी वयाच्या २९ व्या वयापर्यंत १८ वेळा रक्तदान व २ वेळा प्लेटनेट दान केले आहे. लोकमत रक्तदान अभियान शिर्डी नगरीत त्यांनी रक्तदान करून लोकमत समूहाच्या मोहिमेत सहभाग घेतला.
----------------------
फोटो -विजय शिरसाठ
रक्तदान करताना रक्तदाते विजय शिरसाठ