निळवंडे होणार रिकामे
By Admin | Updated: June 21, 2014 00:48 IST2014-06-20T23:41:29+5:302014-06-21T00:48:16+5:30
राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्यामुळे हे धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे.
निळवंडे होणार रिकामे
राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्यामुळे हे धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि़२०) दुपारी निळवंडे धरणातून १ हजार ४०० क्यूसेसने पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले़
निळवंडे धरणात पाणी साठविण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे भंडारदरा धरणात अवघा १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे़ पाणी सोडतेवेळी निळवंडेतील पाणीसाठा ६०० दशलक्ष घनफूट इतका होता. मृग नक्षत्र संपत आलेले असतानाही अखेरचा काठ कोरडा पडला आहे़ त्यामुळे या आवर्तनात ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून हे आवर्तन पाच दिवस चालणार असल्याचे जलसंपदाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले़
दरम्यान, मृगनक्षत्रात अद्यापही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत होती़ मात्र, निळवंडेतून पिण्यासाठी आवर्तन सोडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या काही काळासाठी मिटली आहे़ (वार्ताहर)
बोगदा उभारणीचे काम
धरणाच्या पायथ्याशी ३ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या बोगद्याच्या उभारणीचे काम सुरु होणार आहे.
हा बोगदा धरणाच्या ५९८ मीटर म्हणजेच धरणातील मृतपाणी साठ्याला लागून आहे़ त्यामुळे हे काम करण्यासाठी धरण पूर्णपणे रिकामे करावे लागणार आहे़
आवर्तन संपताच प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे़ बोगद्याचे काम १५ दिवस चालणार असल्याचे सांगण्यात आले़