दिवाळीपर्यंत झगमगाट
By Admin | Updated: September 23, 2014 23:02 IST2014-09-23T22:52:30+5:302014-09-23T23:02:50+5:30
अहमदनगर : सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

दिवाळीपर्यंत झगमगाट
अहमदनगर : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
वीज भारनियमनाबाबत ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातील ग्राहकांची मोठी नाराजी असते. थकबाकी व नेहमीच्या वीजचोरीमुळे गटनिहाय भारनियमन महावितरणने लागू केले होते. त्यामुळे तीन ते तब्बल आठ तासांपर्यंत वीजकपातीचा सामना ग्राहकांना करावा लागला. त्यातच पाण्याअभावी राज्यातील मोठे वीजनिर्मिती केंद्र बंद पडल्याने झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या भारनियमनाचीही भर पडली. याव्यतिरिक्त स्थानिक उपकेंद्र, रोहित्रांतील बिघाड वेगळाच. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेरपर्यंत भारनियमनाचा चांगलाच चटका ग्राहकांना बसला.
परंतु जुलैमध्ये पंढरपूर यात्रा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महावितरणने २० ते २५ दिवस भारनियमन रद्द केले. त्यानंतर मात्र पाऊस नसल्याने आणखी वीज तूट निर्माण झाली व १०-१५ दिवस विजेचा लपंडाव सुरू झाला. नंतर मात्र आॅगस्टमध्ये आलेला गणेशोत्सव, दरम्यान पावसाची दमदार हजेरी यामुळे अखंडित वीज मिळू लागली. त्यातच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. आता नवरात्रौत्सवात दहा दिवस भारनियमन रद्दचे आदेश महावितरणने काढले आहेत.
आॅक्टोबरमध्ये दसरा व दिवाळी असे सणासुदीचे दिवस असल्याने भारनियमन रद्द होणारच आहे. त्यामुळे ए पासून एफपर्यंतच्या गटातील ग्राहकांनाही अजून महिनाभर तरी २४ तास वीजपुरवठा होईल, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)