साईसंस्थानच्या फलकावर फेकले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:12+5:302021-01-08T05:09:12+5:30
शिर्डी : भाविकांनी दर्शनाला येताना भारतीय वेशभूषेत यावे, असे आवाहन करणाऱ्या साईसंस्थानच्या फलकावर गुरुवारी (दि.७) सायंकाळी भूमाता ब्रिगेडच्या दोन ...

साईसंस्थानच्या फलकावर फेकले काळे
शिर्डी : भाविकांनी दर्शनाला येताना भारतीय वेशभूषेत यावे, असे आवाहन करणाऱ्या साईसंस्थानच्या फलकावर गुरुवारी (दि.७) सायंकाळी भूमाता ब्रिगेडच्या दोन महिला व एका पुरुषाने काळे फेकले.
याप्रकरणी तिघांनाही शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.
भारतीय वेशभूषेत साई मंदिरात प्रवेश करावा, अशा साईसंस्थानच्या आवाहनाच्या फलकावरून गेल्या महिन्यात वाद निर्माण झाला होता. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी १० डिसेंबर रोजी हा फलक हटवण्याचा इशारा दिला होता. यावरून शिर्डीत मोठे वादंग पेटले होते. देसाई ३१ डिसेंबरला शिर्डीकडे येत असताना त्यांना सुप्याजवळ पोलिसांनी अडवले व पुन्हा पुण्याला पाठवून दिले होते.
त्यानंतर हा बोर्ड आपण हटविणारच असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गुरुवारी (दि.७) संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास दोन महिला व एका पुरुषाने गेट नंबर एक समोरील फलकावर काळ्या रंगाचे ऑइल फेकले. यावेळी साई संस्थांनच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.
हर्षल मनोहर पाटील (वय २७, रा. कोपरठाणे), मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय ४५, रा. जत, जि. सांगली) व मनीषा राजाराम कुंजीर (वय ३८, रा. वाघोली, पुणे) यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
हर्षल पाटील याने आपण भूमाता ब्रिगेडचा पदाधिकारी असल्याचे सांगितले. याप्रकरणी साईसंस्थानच्या वतीने शिर्डी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.