भाजपाची ताकद वाढणार
By Admin | Updated: October 21, 2014 00:59 IST2014-10-21T00:41:35+5:302014-10-21T00:59:21+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या,

भाजपाची ताकद वाढणार
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या, त्यांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. यामुळे पुढील काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे तीन सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या सदस्यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असून त्या ठिकाणी नव्याने पोट निवडणुका होणार आहेत.
जिल्ह्यात अडीच वर्षापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने सर्वात चांगले यश मिळविले होते. जिल्हा परिषदेत ३२ सदस्यांसह राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर होती. अशी अवस्था पंचायत समिती सभापती पदाच्या बाबतीतही होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल़्ह्यातील राजकीय चित्र बदलेले आहे. पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात पाच आमदार भाजपाचे निवडून आले आहेत. कोपरगावात राष्ट्रवादीतून स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या असून त्यांचे तीन समर्थक सदस्य आहे. पाथर्डीतून मोनिका राजळे विजयी झाल्या असून त्यांच्याकडे दोन समर्थक सदस्य आहेत.
काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले वांबोरी गटातील सदस्य अॅड. सुभाष पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. नेवाशातील काँग्रेसच्या सदस्या आशा मुरकुटे यांचे पती भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. अकोल्यातील सदस्या सुनीता भांगरे यांचे पती अशोक भांगरे यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. पारनेरात सेनेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे भाजपाचे उमेदवार होते. संगमनेरात राष्ट्रवादीच्या सदस्या ललिता आहेर यांचे पती जनार्दन आहेर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. या सदस्या अथवा त्यांचे नातेवाईक जरी तांत्रिकदृष्ट्या त्या त्या पक्षात आले, तरी त्यांनी पक्ष विरोधीकृती केलेली आहे. काहींनी विरोधी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होते, याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे कागदावर ३२ सदस्य दिसत असले तरी १० सदस्य विधानसभा निवडणुकीत वेगळ्या भूमिकेत होते. तर काँग्रेसचे ३ आणि सेनेच्या २ सदस्यांनी पक्षाच्या विरोधी काम केले. या सदस्यांवर कारवाई झाली नाही, पुढील अडीच वर्षासाठी या ठिकाणी भाजपाचे वर्चस्व राहणार असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. (प्रतिनिधी)