भाजपाचा नगरसह आठ जागांवर दावा!

By Admin | Updated: June 12, 2014 00:07 IST2014-06-11T23:32:30+5:302014-06-12T00:07:20+5:30

विधानसभा : ताकद वाढल्याने पक्षात ‘फिल गुड’

BJP's claim to eight seats; | भाजपाचा नगरसह आठ जागांवर दावा!

भाजपाचा नगरसह आठ जागांवर दावा!

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने भाजप नेते-कार्यकर्ते ‘फिल गुड’अनुभवित आहेत. राज्यात व जिल्ह्यात ताकद वाढल्याने युतीत भाजप लहानाचा मोठा भाऊ बनला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात निम्म्या तर जिल्ह्यात आठ जागांवर दावा सांगणार आहे.
जिल्ह्यात सध्या शिवसेनेकडे ७ आणि भाजपकडे ५ जागा आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश हे केवळ नरेंद्र मोदींमुळेच मिळाले. हे भाजपसह शिवसेनेचे कार्यकर्तेही उघडपणे मान्य करतात. याच मानसिकतेचा भाजप जागावाटपावेळी फायदा उठविणार आहे.
जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आठ जागा भाजपकडे घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रह धरीत आहेत. नेतेमंडळी या मागणीला अनुकूल आहेत.
नगरच्या जागेवरही पक्षाने हक्क सांगावा. यासाठी कार्यकर्त्यांनी मागील बैठकीत ठराव केला. पक्षाचे नगरसेवकही त्यासाठी अनुकूल आहेत. यास उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दुजोरा दिला.
नगरमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल राठोड गेल्या २० वर्षांपासून आमदार आहेत. राज्यातील जागावाटपात गुहागरची जागा भाजपने शिवसेनेच्या रामदास कदम यांच्यासाठी सोडली होती. तेथे विनय नातू हे निवडून येत. त्याबदल्यात नगरची जागा मागा असा प्रस्ताव समोर आला होता.
परंतु पक्षातील शिवसेना धार्जिण्या मंडळींनीच तो फेटाळून लावल्याचे भाजपचे नेते, कार्यकर्ते सांगतात. (प्रतिनिधी)
मोदींची यंत्रणा महाराष्ट्रात
मोदींची यंत्रणा या आठवड्यापासून महाराष्ट्रातील प्रश्न जाणून घेण्यासाठी येणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद आहे. कोण इच्छुक आहे. कोणत्या जागेवर फेररचना होऊ शकते, या बाजू ही यंत्रणा जाणून घेणार आहे. मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय भूकंप झाला नाही. अन्यथा स्थिती वेगळी पाहायला मिळाली असती, असे भाजप नेत्याने सांगितले.
कोणाकडे किती
जिल्ह्यात सध्या सात-पाच असे सूत्र आहे. श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव -पाथर्डी व नेवासा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. राहुरी आणि कर्जतमध्ये आमदार आहेत. शिवसेनेकडे नगर, शिर्डी, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगाव, अकोले व संगमनेर आहे. त्यातील संगमनेर, श्रीरामपूर आणि शिर्डी या जागा भाजप मागणार आहे. संगमनेरमध्ये थोरात यांच्या विरोधात वसंतराव गुंजाळ अवघ्या ५ हजारांनी पराभूत झाले होते. नंतर ही जागा सेनेकडे गेली. ती पुन्हा भाजपला हवी आहे. अन्य पक्षातील मंडळी भाजपच्या वाटेवर आहेत. ते मतदारसंघही भाजप मागणार आहे.
भाजपची ताकद बहुतांशी मतदारसंघात वाढली आहे. जागावाटपात त्याचाही विचार केला जाईल. शिवसेनेकडे असलेल्या पण सातत्याने पराभव होणाऱ्या जागांची फेररचना करावी लागेल. महायुतीत नव्याने पक्ष आले आहेत. त्यांनाही हिस्सा द्यावा लागेल. या सर्व बाबींचा विचार प्रदेश पातळीवर सुरू आहे.-आमदार राम शिंदे, राज्य सरचिटणीस,भाजप.

Web Title: BJP's claim to eight seats;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.