शासकीय विश्रामगृहावर भाजपची कमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:33+5:302021-07-23T04:14:33+5:30
अहमदनगर : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर चक्क भाजपची कमान उभारण्यात आली आहे. शहर भाजपच्या वतीने ...

शासकीय विश्रामगृहावर भाजपची कमान
अहमदनगर : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर चक्क भाजपची कमान उभारण्यात आली आहे. शहर भाजपच्या वतीने उभारलेली ही कमान शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शहर भाजपकडून सुरू आहे. येथील शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष पाटील यांची बैठक आहे. शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारावर मोठी कमान गुरुवारी सायंकाळी उभारण्यात आली. त्यामुळे शासकीय विश्रामगृह भाजपमय झाले आहे. शासकीय विश्रामगृहात राजकीय पक्षांच्या बैठका होत असतात. परंतु, राजकीय पक्षांना पताका व कमान उभारण्यास प्रशासनाकडून परवानगी दिली जात नाही. असे असतानाही भाजपने मात्र शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारावर कमान उभारून एक प्रकारे नियमांची पायमल्ली केली आहे. नियम धाब्यावर बसवून प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले जात आहे. यापूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे नगर दौऱ्यावर आले असता शहर शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर कमान उभारण्यात आली होती. परंतु, मंत्री शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याआधीच कमान हटविण्यात आली हाेती. त्यामुळे शिवसेनेचे चांगलेच हसे झाले होते.
....
सार्वजनिक बांधकाम विभागाची चुप्पी
शासकीय विश्रामगृहात भाजपने उभारलेल्या कमानीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. या विभागाने भाजपच्या कमानीवर आक्षेप घेतला किंवा नाही, हे समजू शकले नाही.
....
२१ बीजेपी