साकत येथे भाजप-राष्ट्रवादीत लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:10+5:302021-01-08T05:09:10+5:30
जामखेड : तालुक्यातील साकत ग्रामपंचायत प्रतिष्ठेची होत असून पंचायत समितीचे माजी सभापती व कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर ...

साकत येथे भाजप-राष्ट्रवादीत लढत
जामखेड : तालुक्यातील साकत ग्रामपंचायत प्रतिष्ठेची होत असून पंचायत समितीचे माजी सभापती व कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला हाताशी धरून पॅनेल उभा केला आहे, तर भाजपचे विखे गटाचे प्रा. अरुण वराट यांनी बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. संजय वराट यांच्याबरोबर हातमिळवणी करून पॅनेल उभे केले आहे.
प्रा. अरुण वराट यांच्या गटाच्या दाेन जागा बिनविरोध आल्या असून उर्वरित ११ जागांवर दुरंगी लढत होत आहे. साकत ग्रामपंचायत तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या साकत गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व कॉंग्रेस हे प्रबळ पक्ष मानले जात होते. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांचा संपूर्ण गट भाजपमध्ये गेला. त्यामुळे भाजपचा गट बलाढ्य झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत पाटील व संजय वराट असल्याने राष्ट्रवादी ताकदवान झाली होती. परंतु, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच दोन्ही प्रमुख पक्षातील गटबाजी समोर येऊन एकमेकांच्या विरोधात पॅनेल उभे केले गेले. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील हनुमंत पाटील यांनी भाजपचे डॉ. भगवान मुरूमकर यांच्याशी हातमिळवणी करून साकेश्वर जनसेवा पॅनेल तर भाजपमधील विखे समर्थक प्रा. अरुण वराट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. संजय वराट यांच्याशी हातमिळवणी करून साकेश्वर परिवर्तन मंडळ तयार केले. या मंडळाने पहिल्याच धडाक्यात प्रभाग ४ मधून राजू परमेश्वर वराट व प्रभाग २ मधून मैनाबाई शिवाजी कोल्हे यांना बिनविरोध निवडून आणून सत्ताधारी जनसेवा पॅनेलपुढे आव्हान उभे केले आहे. दोन्ही मंडळांत आजी-माजी सरपंच, उपसरपंच व विद्यमान सदस्यांचा सहभाग आहे.