विरोधी पक्षनेते पदाचा भाजपला योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:54+5:302021-07-05T04:14:54+5:30

अहमदनगर : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता विरोधी पक्षनेता बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. आघाडीने विरोधी पक्षनेते पदाचा शब्द भाजपाला ...

BJP as Leader of Opposition | विरोधी पक्षनेते पदाचा भाजपला योग

विरोधी पक्षनेते पदाचा भाजपला योग

अहमदनगर : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता विरोधी पक्षनेता बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. आघाडीने विरोधी पक्षनेते पदाचा शब्द भाजपाला दिल्याचे समजते. भाजपककडून विरोधी पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नावाची चर्चा आहे.

महापौर व उपमहापौरांची निवडणूक बिनविरोध झाली. महापाैर पदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. नगर शहर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येते. खासदार डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणेचे नेतृत्व करतात. महापौर, उपमहापौर निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर खासदार विखे हे स्वत: लक्ष ठेवून होते. खासदार विखे यांनी महापौर निवडणुकीबाबत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची विळद घाटात बैठकीत घेतली होती. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही नगरसेवकांची बैठक घेऊन निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. महापौर पदासाठी उमेदवार नसला तरी ऐनवेळी चमत्कार होईल, अशी भाजपला अपेक्षा होती. पण, आमदार संग्राम जगताप यांनी आघाडीचा धर्म पाळत सेनेशी जुळवून घेतले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. सेना- राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा पार केला. काँग्रेसनेही आघाडीला साथ दिली. भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्या बदल्यात आघाडीने भाजपला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असल्याचे समजते. विरोधी पक्षनेते पदाबाबत भाजपच्या नगरसेवकांची अंतर्गत एक बैठकही झाली. विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे इच्छुक आहेत. गत आडीच वर्षांच्या कार्यकाळात भाजपाच्या सर्वच नगरसेवकांनी सभागृह नेते, महिला बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सदस्य अशी वेगवेगळी पदे भूषविली. भाजपमध्ये एकही पद न घेतले गंधे हे एकमेव नगरसेवक आहेत. माजी महापाैर बाबासाहेब वाकळे हेही विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. विरोधी पक्षनेते पदाचे पत्र महापौरांनी द्यावे लागते. सध्या राष्ट्रवादीचे संपत बारस्कर हे विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी आहे. राष्ट्रवादीही हे पद सोडण्याच्या मानसिकतेत आहे. गतवेळी भाजपाला राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला होता. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले हाेते. वास्तविक पाहता गत अडीच वर्षांत विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेनेने या विरोधात दाद मागितली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे बारस्कर हे अडीच वर्षे विरोधी पक्षनेते राहिले. यावेळी परिस्थती वेगळी आहे. महापौर निवडणुकीत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. मनपात राष्ट्रवादीचे १९, सेनेचे २३ आणि काँग्रेसचे ५ नगरसेवक आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असल्याने महापालिकेत सर्वात मोठा विरोधी पक्ष सध्या भाजप आहे. भाजपाचे १५ नगरसेवक आहेत. म्हणूनच भाजपनेही विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह धरला असावा. गत अडीच वर्षे भाजप आणि राष्ट्रवादी मनपात एकत्र होते. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षनेते पद देण्यास राष्ट्रवादीची हरकत राहणार नाही. सेनेने भाजपला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिलेला असल्याने विरोधी पक्षनेते पदाचा भाजपचा योग जुळून येईल, असे बोलले जाते.

....

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यात शिवसेना व भाजपमध्ये सध्या टोकाचा संघर्ष सुरू आहे. महापालिकेतही सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. महापौर पद सेनेकडे आहे. महापौर निवडणुकीपूर्वी सेनेने जरी शब्द दिला असला तरी हा शब्द शिवसेना पाळणार का, याबाबत साशंकता आहे. कारण भाजपने मागील अडीच वर्षे सेनेला सत्तेबाहेर ठेवले. त्यामुळे शिवसेना भाजपला सहजासहजी विरोधी पक्षनेते पद देईल, असे वाटत नाही. त्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागेल, असेही दिसते.

Web Title: BJP as Leader of Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.