भाजपला समारोपाची, तर राष्ट्रवादीला सत्तांतराची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:08+5:302021-06-24T04:16:08+5:30
अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडून समारोपाची जय्यत तयारी सुरू असताना स्थायी समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच सक्रिय होत ...

भाजपला समारोपाची, तर राष्ट्रवादीला सत्तांतराची घाई
अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडून समारोपाची जय्यत तयारी सुरू असताना स्थायी समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच सक्रिय होत असल्याचे चित्र महापालिकेत आहे. यावरून अगामी महापौर सेनेचा असला तरी दबदबा मात्र राष्ट्रवादीचाच असेल, अशीच शक्यता निर्माण झाली आहे.
महापाैर बाबासाहेब वाकळे यांची मुदत ३० जूनला संपुष्टात येत आहे. मुदत संपण्याआधी अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी महापौर वाकळे यांनी कंबर कसली आहे. त्यांचा सर्वाधिक वेळ ते सध्या पाणी योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी देत आहेत. त्याचबरोबर अडीच वर्षांच्या कार्यकाळातील जे विषय राहिलेले आहेत, ते सर्व विषय शेवटच्या सभेत मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी शेवटची सभा येत्या शुक्रवारी बोलविली आहे. त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा आहे. या सभेत अधिकाधिक विषयांना मंजुरी देणे, हाच महापौर वाकळे यांचा अजेंडा आहे. ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौर झाले आहेत. त्याची जाणीव ठेवत त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कधी अंतर दिले नाही. त्यांना सन्मानाचीच वागणूक दिली. विरोधी पक्षनेते पद संपत बारस्कर यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीनेही विरोधाची तलवार अडीच वर्षे म्यान ठेवली. असे असले तरी सत्तांतराची वेळ जवळ येऊ लागल्याने राष्ट्रवादी मनपात अप्रत्यक्षरीत्या सक्रिय होताना दिसते आहे. स्थायी समिती सभापती हे महत्त्वाचे पद राष्ट्रवादीकडे आहे. सभापती अविनाश घुले यांनी बैठकांचा धडका लावला आहे. त्यांच्या दालनात अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवकांची वर्दळ वाढली आहे. स्थायी समितीचा कारभार पाहता मनपात राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याची परिस्थिती आहे. अगामी महापौर पदासाठी राष्ट्रवादीने सेनेशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे महापौर सेनेचा, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमहापौर पद येईल, असे चित्र सध्या तरी आहे. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता पाठाेपाठ आता उपमहापौर हे पदही मिळणार असल्याने राष्ट्रवादीचे महापालिकेतील पारडे आणखी जड होईल. त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि बसपाच्या नगरसेवकांची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आणखी वाढली आहे.
...........................
स्थायी समिती व सर्वसाधारण सभा एकाच दिवशी
स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी स्थायी समितीची सभा उद्या, शुक्रवारी दुपारी १२ वाजता बोलविली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेची सर्वधारण सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता होणार आहे. या दोनही सभा ऑनलाईन होणार असून, दोन सभांमध्ये एक तासाचे अंतर आहे. महापौर वाकळे यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.