भाजप-कॉँग्रेस-राष्ट्रवादीची युती?

By Admin | Updated: June 10, 2016 23:39 IST2016-06-10T23:36:30+5:302016-06-10T23:39:36+5:30

अहमदनगर : उपमहापौर पदाचा तिढा सुटला नसतानाच सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न भाजपमधील गांधी गटाकडून सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे.

BJP-Congress-NCP alliance? | भाजप-कॉँग्रेस-राष्ट्रवादीची युती?

भाजप-कॉँग्रेस-राष्ट्रवादीची युती?

अहमदनगर : उपमहापौर पदाचा तिढा सुटला नसतानाच सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न भाजपमधील गांधी गटाकडून सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीची मदत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गांधी गटाने पुढाकार घेतला असून तशी राजकीय चाचपणी करण्यासाठी गांधी गटाच्या चार नगरसेवकांची बैठक पक्ष कार्यालयात शुक्रवारी पार पडली. नगरच्या राजकीय वर्तुळात तशी चर्चा दोन दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू आहे. तिन्ही पक्षाच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला.
महापालिकेत सर्वाधिक राष्ट्रवादी शहर विकास आघाडीचे २१ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल सेनेचे १९, कॉँग्रेस ११ तर भाजपचे ९ नगरसेवक आहेत. मनसे ४ आणि अन्य अपक्ष असे बलाबल महापालिकेत आहेत. सेनेचे १९ आणि भाजपचे ५ नगरसेवक तसेच आघाडी-मनसेचे काही नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत.
महापौर पदासाठीचे अपेक्षित संख्याबळ होत नसल्याने आघाडीत तशी सामसूम आहे. भाजपमधील नगरसेवक खासदार दिलीप गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यात विभागले गेले आहेत. आगरकर गटाचे नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत. गांधी गटाचे चार नगरसेवक नगरमध्येच आहेत. या नगरसेवकांची बैठक गांधी मैदानातील पक्ष कार्यालयात झाली. त्यात या अनोख्या युतीचा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. नंदा मनेष साठे, मालन ढोणे, श्रीपाद छिंदम, सुवेंद्र गांधी हे चार नगरसेवक तसेच पक्षाचे गौतम दीक्षित, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, रवी बारस्कर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी-कॉँग्रेस व भाजपची युती करून महापौर आणि उपमहापौर पद भाजपकडे घ्यायचा असा हा फॉर्म्युला आहे. तसे झाले तर नगरच्या राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विरोधात बसण्याची वेळ आलीच तर त्यापेक्षा भाजपसोबत सत्तेत बसण्यात आघाडीलाही हरकत नसल्याचे सूत्रांकडून समजते. नगरच्या राजकीय क्षेत्रात आघाडीचा खरा शत्रू हा सेना आहे. भाजपच्या मदतीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आघाडीचेही भलेच आहे.
खासदार दिलीप गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाल्याचे दिक्षीत यांनी सांगितले.
अभय आगरकर तसेच अन्य नगरसेवकांनाही निरोप दिले होते. मात्र ते घरगुती कारणामुळे बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगत भाजपच्या गैरहजर नगरसेवकांचे दिक्षीत यांनी समर्थन केले.
‘शत प्रतिशत भाजप’ असा नारा देत या नगरसेवकांनी जे येतील त्यांच्यासोबत अन् न येतील त्यांच्याशिवाय असे स्पष्ट करत दिक्षीत यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार आगरकर गटाचे नाही तर ते पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे ते येतील. भाजपचाच महापौर अन् उपमहापौर होईल.
(प्रतिनिधी)
भोसलेही अनोख्या युतीच्या संपर्कात
मनसेच्या चार नगरसेवकांपैकी तिघे नगरसेवक सेनेच्या कळपात दाखल झाले आहेत. गटनेते गणेश भोसले हे नगरमध्येच असून ते या अनोख्या युतीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुवेंद्र गांधींना नकोय पद
भाजपचे नगरसेवक व खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी पक्षाच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. महापौर, उपमहापौर किंवा महापालिकेत कोणतेच पद मला नकोय. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असे स्पष्ट करत सुवेंद्र गांधी यांनी सर्व पदे ही पक्षातील अन्य नगरसेवकांना दिली जातील असे स्पष्ट केल्याचे दिक्षीत यांनी सांगितले.

Web Title: BJP-Congress-NCP alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.