भाजपा महसूलमंत्र्यांच्या पाठीशी
By Admin | Updated: May 18, 2016 23:59 IST2016-05-18T23:48:53+5:302016-05-18T23:59:47+5:30
संगमनेर : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जेलमध्ये पाठविण्याची अंजली दमानिया यांची भाषा म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी केलेले विधान आहे.

भाजपा महसूलमंत्र्यांच्या पाठीशी
संगमनेर : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जेलमध्ये पाठविण्याची अंजली दमानिया यांची भाषा म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी केलेले विधान आहे. काम करताना हित साधले गेले नाही की, हितचिंतकांकडून आरोप होतात. त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे भाजपा खडसे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली.
बुधवारी सायंकाळी एका खासगी कार्यक्रमानिमित्त संगमनेरात आले असता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्रात सत्तेवर आलेले भाजपा-शिवसेनेचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. दानवे म्हणाले, शासकीय जमीन कोणत्याही संस्थेला न देण्याचा निर्णय झाला आहे. खासगी पातळीवर शिजलेले हे प्रकरण आधीच फेटाळले गेले असून त्यात काहीही तथ्य नाही. भाजपा मंत्र्यांवर यापूर्वी अनेक आरोप झाले. परंतु एकही सिद्ध होऊ शकला नसल्याचा खुलासा दानवे यांनी केला. भाजपा-सेनेच्या शीतयुद्धावर भाष्य करताना दानवे यांनी दोन्ही पक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे युती सरकार पाच वर्षे कुठलीही चिंता न करता टिकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी)