शेवगावात उद्यापासून पक्षी मित्र संमेलन; राज्यभरातून येणार पक्षी मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 21:20 IST2025-01-30T21:19:52+5:302025-01-30T21:20:12+5:30
विविध तज्ज्ञांची होणार व्याख्याने

शेवगावात उद्यापासून पक्षी मित्र संमेलन; राज्यभरातून येणार पक्षी मित्र
लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे शनिवार (दि.१ फेब्रुवारी) ते रविवार (दि. २ फेब्रुवारी) असे दोन दिवस ३७ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी, संमेलनाध्यक्ष नाशिक पक्षीमित्र संघटनेचे सहसंघटक डॉ. अनिल माळी, प्रमुख पाहुणे निसर्ग अभ्यासक, जागतिक छायाचित्रकार बैजू पाटील, अहिल्यानगर येथील उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे, तर प्रमुख उपस्थिती पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. गजानन वाघ, स्वागताध्यक्ष बापूसाहेब भोसले असतील.
शनिवारी (दि.१) दुपारी एकपासून विविध विषयावर सादरीकरण होणार आहे. प्रथम सत्र माणिक पुरी यांचे ‘पाणपक्ष्यांशी जडले नाते’ या विषयावर, द्वितीय सत्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे ‘पाणथळी : धोके आणि संवर्धन’, तृतीय सत्र राहुल प्रदीप वकारे यांचे ‘वर्धा जिल्ह्यातील पाणथळी आणि पक्षी’, चौथे सत्र ‘धुळे जिल्हा पाणथळी : २०१४ ते २०२४ दशकातील बदल एक दृष्टीक्षेप’, पाचवे सत्र डॉ. मिलिंद शिरभाते यांचे ‘पाणथळी पक्षी संवर्धन आणि एनईपी २०२०’ या विषयावर, सहावे सत्र डॉ. अश्विन लुंगे यांचे ‘अप्पर वर्धा जलाशयातील पाणपक्ष्यांची वीण आणि धोके’, सातवे सत्र रवींद्र वामनाचार्य यांचे ‘भारतीय टपाल तिकिटांवर पाणपक्षी’ या विषयावर सादरीकरण होणार आहे. यावेळी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाही होणार आहे.
रविवारी (दि. २) जायकवाडी पक्षी निरीक्षण या सहलीने संमेलनास सुरवात होईल. त्यानंतर प्रथम सत्र डॉ. अनिल माळी यांचे ‘ नाशिक जिल्ह्यातील पाणथळी आणि पक्षी जीवन’, डॉ. गजानन वाघ यांचे ‘सातपुड्याच्या नदी परिसंस्थेतील मलबार पाईड हॉर्नबिल’, अविनाश कुबल यांचे ‘महाराष्ट्रातील पाणथळी आणि पक्षी निरीक्षण स्थळांचा अभ्यास आणि नोंदणी’, शरद आपटे यांचे ‘पाणपक्षी त्यांचा विणीचा हंगाम आणि त्यांचे आवाज’, प्रतीक चौधरी यांचे ‘तापी नदीतील नदी टिटवीची सद्यस्थिती’, कपिल दैवत यांचे ‘गवताळ व पडीक जमीन भागातील पक्षी जैवविविधता’ या विषयावर सादरीकरण होईल.
संमेलन समारोप कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे असतील. पक्षी या विषयावर घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी दिली.
‘पाणथळी आणि पाणपक्षी’ संमेलनाची संकल्पना..
पक्षी मित्र संमेलनाची सुरूवात वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडीने होणार आहे. याप्रसंगी छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. यंदा संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना पाणथळी आणि पाणपक्षी अशी आहे.