पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा
By Admin | Updated: January 12, 2016 23:36 IST2016-01-12T23:32:24+5:302016-01-12T23:36:13+5:30
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे

पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे. पक्ष्यांना चारा, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वांगदरी येथील शेतकरी प्रल्हाद निवृत्ती नागवडे यांनी आपल्या साडेतीन एकर ज्वारीच्या शेतात चार पाणवठे तयार करून ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला केला आहे. ज्वारीच्या सोन्यासारख्या टपोऱ्या कणसावर ऐटीत बसून विविध प्रकारचे पक्षी ताव मारून पाणी पिण्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी घोड धरणाच्या लाभ क्षेत्रातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी,गव्हाच्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. प्रल्हाद नागवडे यांनी नऊ एकर शेतीपैकी साडेतीन एकर क्षेत्रात ज्वारीची पेरणी करुन ज्वारी पिकास खतपाणी घातले.
त्यामुळे जोंधळ्याला चांदणे लगडले. दुष्काळीस्थितीमुळे जिरायत भागातील विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागविण्यासाठी घोडच्या पट्टयात आले आहेत. प्रल्हाद नागवडे व त्यांचा मुलगा अविनाश नागवडे यांनी अर्थकारण व स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीव्हीसी पाईप कापून त्याचे पाणवठे तयार केले. विविध प्रकारचे पक्षी नागवडे यांच्या मळ्यात हक्काने येऊन भूक, तहान भागवितात, तृप्त पक्षी मंजुळ किलबिलाट करतात. पक्ष्यांचे मनोहारी दृश्य पाहून नागवडे परिवाराला आगळावेगळे समाधान मिळत आहे. अध्यात्मिक
वारसा असलेले प्रल्हाद नागवडेंचे कुटुंब हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवित आहे.
ईश्वराच्या सेवेपेक्षा पशू, पक्ष्यांच्या सेवेतून अधिक समाधान मिळते. यात मोठा आनंद आहे. ‘पक्षी येती शेतात, आम्हा तोचि दिवाळी दसरा’. कायम दिवाळी, दसरा साजरा होण्यासाठी दरवर्षी ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करणार आहे.
-प्रल्हाद नागवडे, प्रगतशील शेतकरी, वांगदरी
दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे मार्च, मे महिन्यात पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पशु, पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. माणसांच्या जेवणावळी उठविण्यापेक्षा प्रल्हाद नागवडे या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी पशु, पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करावी. यामधून सुट्टीचा आगळावेगळा आनंद लुटावा. आपल्या परिवार,परिसरात वेगळे चैतन्य निर्माण होईल.
-ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा.