‘बमुपा’चा धिक्कार मोर्चा
By Admin | Updated: July 23, 2014 00:15 IST2014-07-22T23:12:43+5:302014-07-23T00:15:48+5:30
अहमदनगर: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन पध्दत बंद करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा नेण्यात आला़
‘बमुपा’चा धिक्कार मोर्चा
अहमदनगर: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन पध्दत बंद करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा नेण्यात आला़ आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़
बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला़ जुने बसस्थानक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला़ प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले़ त्यामुळे वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी भाषणे झाली़ शासनाच्या कार्यपध्दतीवर त्यांनी जोरदार टीका केली़ लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशिनचा वापर झाला़ निवडणूक आयोगाची मतदान घेण्याची ही पध्दत चुकीची असल्याचे सांगून ही पध्दत तातडीने रद्द करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़
याशिवाय राज्यातील डीएडधारकांना शासनाने भत्ता सुरू करावा, महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, केंद्र सरकारने केलेली भाव वाढ रद्द करण्यात यावी,या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता़ यावेळी शासनाकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करत शासनाच्याविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़
यावेळी प्रदेश सचिव सुरेश वाघ, हभप अजय महाराज बारस्कर, राज्य उपाध्यक्ष संभाजी बोरुडे, संतोष रोहम, भानुदास बोराटे, दीपक वाळे आदी उपस्थित होते.