रेशनचे धान्य काळ्या बाजारात, अहमदनगर जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 16:28 IST2022-11-15T16:22:38+5:302022-11-15T16:28:55+5:30
रेशनचे ३३ टन धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

file photo
अहमदनगर : गोरगरीब जनतेसाठी आलेले रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र मुख्य आरोपी मोकाट असून, त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यास मोठा घोटाळा समोर येईल. हा गुन्हा सर्वसामान्यांशी निगडित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपास करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
रेशनचे ३३ टन धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर रेशनच्या काळ्या बाजारात होत असलेल्या विक्रीबाबत तक्रारी देण्यासाठी राजकीय पक्ष पुढे आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या काळ्या बाजार बाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच आम आदमी पार्टीचे किरण उपकारे यांनीही पोलिस अधीक्षक ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा योग्य तपास केल्यास रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट समोर येईल. परंतु, एमआयडीसी पोलिसांकडून योग्य तपास होताना दिसत नाही. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उद्धव पवार हा असून, गुन्ह्यातून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा गुन्ह्यात समावेश करून हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकले जात आहेत. जिल्हा पुरवठा, पोलिस आणि ठेकेदार यांचे संगनमत आहे. मुख्य आरोपींचे कॉल डिटेल्स तपासल्यास हा प्रकार समोर येईल, असे आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाथर्डी तालुक्यातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात
बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ढाकणे यांनी ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी येथील शासकीय गोडावूनला भेट दिली होती. त्यावेळी पाठीमागच्या बाजूला एक विटकरी रंगाचा ११०९ टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये शासकीय गहू व तांदूळ भरत असताना आढळून आले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता हा टेम्पो शासकीय ठेकेदाराचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शासकीय ठेकेदाराचे वाहन विशिष्ट हिरव्या रंगाची असतात. परंतु, या वाहनावर तसे काही नव्हते. यावरून रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट पाथर्डी तालुक्यात सक्रिय असण्याची शक्यता आहे. शासनाने रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या गाडे ट्रान्सपोर्टची नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराने शासनाच्या नियमानुसार वाहनांना हिरवा रंग देऊन वाहतूक करावी, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यावेळी किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, सुनील पाखरे, नवनाथ गर्जे आदी उपस्थित होते.
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेले वाहन पकडले असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
- युवराज आठरे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे