नगर तालुक्यातील बड्या नेत्यांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:30+5:302020-12-16T04:35:30+5:30
केडगाव : माजी राज्यमंत्र्यांसह जि.प.चे उपाध्यक्ष, नगर तालुक्यातील ५ जि.प. सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, बाजार समितीचे सभापती, ...

नगर तालुक्यातील बड्या नेत्यांचा लागणार कस
केडगाव : माजी राज्यमंत्र्यांसह जि.प.चे उपाध्यक्ष, नगर तालुक्यातील ५ जि.प. सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांच्यासह नगर तालुक्यातील बड्या नेत्यांच्या गावात आता ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. जिल्हा गाजवणाऱ्या नेत्यांचा गावात आता चांगलाच कस लागणार असल्याने नगर तालुक्यातील ५९ गावांची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.
येत्या १५ जानेवारीला नगर तालुक्यातील तब्बल ५९ गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर गावात तीस वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील पंचवार्षिकमधील काही प्रभागांतील निवडणुकीमुळे खंडित झाली. यामुळे यावेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब शेळके यांच्या खारेकर्जुने गावातही निवडणूक होत आहे. याबरोबरच जि.प. सदस्य संदेश कार्ले (खंडाळा), माधवराव लामखडे (निंबळक), डॉ. भाग्यश्री मोकाटे (इमामपूर), बाळासाहेब हराळ (गुंडेगाव) या जि.प. सदस्यांच्या गावांत निवडणूक होणार असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे (चिंचोडी पाटील), उपसभापती रवींद्र भापकर (रुई), माजी सभापती रामदास भोर (भोरवाडी), माजी सभापती अशोक झरेकर (घोसपुरी) यांच्या गावातही निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे (तांदळी वडगाव), उपसभापती संतोष म्हस्के (वाळुंज) यांच्यासह माजी सभापती हरिभाऊ कर्डिले (वाकोडी), माजी सभापती विलासराव शिंदे (देवगाव), तसेच इतर संचालकांच्या गावांतील निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवरेबाजार, डोंगरगण, मांजरसुंबा या आदर्श गावांत निवडणूक लागली आहे. निबंळक व नवनागापूर या जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत गावांतील निवडणूकही गाजण्याची चिन्हे आहेत.
....
जोड