श्रीगोंद्याचा भूमिपुत्र झाला 'कृष्णा खोरे'चा मुख्यअभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:41+5:302021-09-03T04:21:41+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे भूमिपुत्र व कुकडी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती ...

श्रीगोंद्याचा भूमिपुत्र झाला 'कृष्णा खोरे'चा मुख्यअभियंता
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे भूमिपुत्र व कुकडी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धुमाळ यांनी जलसंपदा विभागात सहायक अभियंतापासून मुख्यअभियंतापर्यंत कामगिरीची मोहर उमटविली आहे.
हेमंत धुमाळ यांचे माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात झाले. पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन डिप्लोमा केला. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. सिव्हिल, तर मुंबईत व्हीजीटीआय कॉलेजमधून एमटेकची पदवी संपादन केली. राळेगणसिद्धी येथून त्यांनी स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी सेवेचा प्रारंभ केला. नंतर जळगाव येथील बहुळा धरणाच्या घळभरणीचे व प्रथम पाणी साठवण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर १९९९ साली एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा वर्ग-१ या पदासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये राज्यांमध्ये सर्वप्रथम येऊन सहायक कार्यकारी अभियंता वर्ग-१ या पदावर दौंड येथे काम सुरू केले. पुढे भोर येथे बदली झाली. भोर येथे निरा देवघर या मोठ्या प्रकल्पाची सुमारे १० टीएमसी क्षमता असलेल्या मोठ्या प्रकल्पाची घळभरणी वेळेत पूर्ण केली. त्याबद्दल राज्य शासनाकडून त्यांचा विशेष गौरव झाला.
अधीक्षक अभियंता म्हणून पुणे येथे गुंजवणी प्रकल्पात पाइप डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे डिझाइन, अंदाजपत्रक व निविदा करण्याचे काम केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्याबरोबर धुमाळ यांनी वॉटर ऑडिट, जललेखा या विषयावर श्रीगोंदामध्ये कार्यशाळा घेतली. ‘माझा कालवा, माझी जबाबदारी’ ही मुख्य कालवा स्वच्छतेची मोहीम त्यांनी यशस्वीरीत्या राबविली. कुकडी आवर्तनामध्ये सुरळीतपणा आला. डिंभे, माणिकडोह १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. त्यांनी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान, मॅसीडोनिया यांसारख्या विविध देशांमध्ये सुमारे २६ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. जपान येथील पूर आपत्ती व्यवस्थापन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
.........
फोटो हेमंत धुमाळ