भानुदास कोतकर न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:01 IST2018-05-19T19:00:51+5:302018-05-19T19:01:00+5:30
केडगाव हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

भानुदास कोतकर न्यायालयीन कोठडीत
अहमदनगर: केडगाव हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य उलगडण्याआधीच भानुदास कोतकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. कोतकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
कोतकर याला विशेष पथकाने पुणे येथून १४ मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. शनिवारी न्यायालयात सरकारी पक्षाने कोतकरला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. कोतकर याच्यावर केडगाव हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. या हत्याकांडापूर्वी केडगाव येथे कोतकरच्या घरी सुवर्णा कोतकर यांच्या उपस्थित एक बैठक झाली होती. याच बैठकीतून सुवर्णा यांनी भानुदास कोतकर याला फोन केला होता. यावेळी कोतकर याने सुवर्णा यांना काय सल्ला दिला होता. याची तपासी यंत्रणेला उत्सुकता होती.
आता सीआयडी करणार तपास
केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला आहे. सोमवारी सीआयडीचे पथक नगरमध्ये येऊन हा तपास वर्ग करून घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली आहे. आता सीआयडी गुन्हा दाखल झालेल्या इतर फरार आरोपींना अटक करणार की आणखी काही वेगळा तपास करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.