फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:49+5:302021-05-19T04:20:49+5:30
फेसबुक हॅक करून फ्रेंडलिस्टमधील मित्रांना पैशाची मागणी करणे, अश्लील संदेश प्रसारित करणे, फोटोंचे एडिटिंग करून ब्लॅकमेल करणे, बदनामी करणे ...

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान!
फेसबुक हॅक करून फ्रेंडलिस्टमधील मित्रांना पैशाची मागणी करणे, अश्लील संदेश प्रसारित करणे, फोटोंचे एडिटिंग करून ब्लॅकमेल करणे, बदनामी करणे आदी स्वरूपाच्या या तक्रारी आहेत. तांत्रिक गोष्टीच्या अज्ञानामुळे अनेक जण हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून गेल्या वर्षभरात फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
.......
अशी केली जाते फसवणूक
फेसबुक अकाउंट हॅक करून त्या अकाउंटचा एक्सेस हॅकर स्वतःकडे घेतात. युजरला त्याचा ॲक्सेस परत देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर त्याच्या फेसबुक अकाउंटवर अश्लील फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. युजरच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारे त्याचे मित्र-मैत्रिणींना अश्लील भाषेत चॅट करून बदनामी केली जाते. किंवा फ्रेंडलिस्टमधील मित्रांना मेसेज पाठवून
पैशांची मागणी केली जाते.असे कृत्य सराईत सायबर हॅकरकडून केले जाते.
.........
बदला घेण्यासाठी ओळखीचेही करतात घात
सराईत सायबर गुन्हेगारांसह काही तक्रारदार महिलांची त्यांच्याच परिचयातील व्यक्तींनी फेसबुकचा गैरवापर करून बदनामी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रेमप्रकरणात ब्रेकअप झाल्यानंतर, तसेच तरुणीचे लग्न मोडण्यासाठी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून बदनामी केल्याच्याही तक्रारी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
......
अशी घ्यावी काळजी
फेसबुक अकाउंटचा पासवर्ड हा मोबाईल नंबर, नाव व जन्मतारीख असा ठेवू नये तसेच पासवर्ड वेळोवेळी बदलावा.
फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फेसबुकचे सेटिंग चेंज करून प्रोफाईल लॉकिंग ही सेटिंग ठेवावी.
आपले फोटो, पोस्ट व कमेंटबाबत प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ओन्ली फ्रेंड्स सेटिंग करून घ्यावी, जेणेकरून वैयक्तिक फोटो सार्वजनिक होणार नाहीत. अशी काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.
............
चार महिन्यात फेसबुक संदर्भातील ५३ तक्रारी दाखल
यातील १३ तक्रारी निकाली निघाल्या.