औटी-शेळके यांच्यात बिनसले
By Admin | Updated: July 15, 2014 00:45 IST2014-07-14T23:05:50+5:302014-07-15T00:45:39+5:30
पारनेर : तालुक्यात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाच्या फलकावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे नाव टाकल्यावरुन वितुष्ट निर्माण झाले आहे़

औटी-शेळके यांच्यात बिनसले
पारनेर : तालुक्यात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाच्या फलकावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे नाव टाकल्यावरुन आमदार विजय औटी व सेनेचे वाडेगव्हाण गटाचे पंचायत समिती सदस्य गणेश शेळके यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे़ शेळके यांनी परस्पर मित्रांची नावे फलकावर टाकल्याने आमदार औटी संतप्त झाले तर शेळके यांनीही यावरुन आमदारांवर पलटवार केला आहे़ त्यामुळे सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
पारनेर तालुक्यात सध्या आमदार विजय औटी व सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी गाव तेथे सेनेची शाखा हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या गावनिहाय दौरा सुरू असताना वाडेगव्हाण पंचायत समिती गणात आमदार विजय औटी यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश शेळके यांनी सेनेच्या शाखा फलकावर विभागप्रमुख व इतरांची नावे टाकली होती. आमदार औटी हे फलक पाहिल्यावर संतप्त झाले़ तुम्ही तुमच्या मित्रांची नावे टाकल्यावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा प्रश्न करीत आ़ औटी यांनी शेळके यांच्यावर नाराजी व्यक्त केली़ व तेथून औटी तात्काळ निघून गेले़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी विनवणी केल्यानंतर दुसऱ्या गावांमधील शाखांचे उद्घाटन औटी यांनी केले़ मात्र, त्याला पंचायत समिती सदस्य गणेश शेळके यांनी दांडी मारली. शेळके हे पंचायत समितीच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्टवादीतून येऊन सेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण त्यांच्या कार्यपद्धतीवर गणामध्ये नाराजीच व्यक्त होत होती. यामुळे खऱ्या शिवसैनिकांची बाजु आमदार औटी यांनी घेतल्याचे शिवसैनिकांनी सांगीतले.
आमदार औटी यांनी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरीसह अनेक भागात केलेल्या सेनेच्या शाखा उद्घाटनात फलक लावताना सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशीकांत गाडे यांचे नाव टाकले नाही़ वाडेगव्हाण गटात आ. औटी यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादीचे काम केल्याचा आरोप करीत शेळके यांनी आमदार औटी यांच्यावरच शाब्दीक हल्ला केल्याने शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगर तालुक्यात औटींविरोधात रणकंदन
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे नाव आ. विजय औटी यांना खटकत असल्याबाबत नगर तालुक्यातील शिवसेनेत उलट-सुलट प्रतिक्रीया उमटल्या. आ. औटी यांना गाडे यांची अॅलर्जी असेल तर नगर तालुक्यातील शिवसैनिक वेगळा विचार करतील, असा इशाराच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़
शिवसेनेत पक्षाला व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच मान असतो. औटी यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ‘अॅलर्जी’ वाटत असेल तर आम्ही निवडणुकीत योग्य ती भूमिका घेऊ़
- प्रकाश कुलट
आ. औटी यांचे प्रा. गाडे यांच्याविषयी असलेल्या कलुषित भावनेचा आम्ही निषेध करतो. नगर तालुक्यातील शिवसैनिक जिल्हाप्रमुखांचा अवमान सहन करणार नाहीत.
- विश्वास जाधव
शिवसेनेत शिवसेना प्रमुखांना व सामान्य शिवसैनिकांनाच मान आहे. त्यांच्या जिवावरच कुणीतरी आमदार-खासदार होत आहे याचे भान ठेवावे. जिल्हाप्रमुखांचा अपमान सहन करणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करुन निर्णय घेऊ़
- संदेश कार्ले
माझ्या पंचायत समिती गणात मी स्वखर्चाने फलक तयार केले व त्यात शिवसेनेच्या नियमाप्रमाणे नावे टाकली़ शिवसेनेच्या शाखा फलकावर सेनेचे जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे यांचे नाव टाकल्याचे पाहुनच आमदार विजय औटी माझ्यावर संतप्त झाले़
-गणेश शेळके,
पंचायत समिती सदस्य़