‘उज्ज्वला’ चे लाभार्थी पुन्हा चुलीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:03+5:302021-08-19T04:26:03+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच ...

‘उज्ज्वला’ चे लाभार्थी पुन्हा चुलीकडे
अहमदनगर : केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील योजनेचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यातच पूर्ण झाले असल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी अहमदनगर जिल्ह्याला उज्ज्वला योजनेतून वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना गॉस कनेक्शन मिळाले त्यांना मात्र महागाईची झळ बसत आहे. सिलेंडर महाग झाल्याने या योजनेचे अनेक लाभार्थी आता चुलीकडे वळाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र गॅस कनेक्शन मिळून देखील ते खरेदी करण्याची ऐपत लोकांमध्ये राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
-------------
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला गॅस कनेक्शन
३ लाख २० हजार १७
--------------
गँस सिलिंडरचे दर (रुपयात)
जाने. २०१९.....५००
जाने. २०२०....६५०
जाने. २०२१....७५०
जुलै २०२१.....८४८
ऑगस्ट-२०२१....८७३
-----------
सिलिंडरसाठी पैस आणायचे कोठून ?
आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला जात होता. गॅस संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी किंमत जास्त असल्यामुळे तो तसाच धूळखात पडला आहे. चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
-आकाश गाडे, नगर
--------
-----
कोरोनामुळे मजुरी मिळणे कठीण झाले आहे. सगळे हाल सुरू आहेत. त्यामुळे गॅस वापरणे शक्य नाही. पावसाळ्यात लाकूड वाळलेले नसतात. रेशनवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
-सरुबाई शिंदे, नगर
-----------
मोदी सरकारने मोफत सिलिंडर दिले आहेत. मात्र ते भरून त्यावर स्वयंपाक करणे परवडत नाही. किंमत वाढल्यामुळे पुन्हा चुलीवर जेवण तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोफत गॅस कनेक्शन उपयोगाचे नाहीत. सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात.
-दीपक कावळे, नगर
------------
डमी क्रमांक- १०४५