विज्ञानयुगात साथरोगाच्या देवता पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:38+5:302021-05-28T04:16:38+5:30
कोेतूळ : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर साथ रोगाची देवता म्हणून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जरीआई-मरीआईला विज्ञानयुगात माणूस विसरला आहे. ...

विज्ञानयुगात साथरोगाच्या देवता पडद्याआड
कोेतूळ : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर साथ रोगाची देवता म्हणून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जरीआई-मरीआईला विज्ञानयुगात माणूस विसरला आहे.
महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, दक्षिण भारत, पंजाब या राज्यांत मरीअम्मा, मारी, मरीमाय, मुक्ताई, रक्तादेवी, नांगरबाबा, खोकल्याई अशा दगडाच्या शेंदूर लावलेल्या देवता आहेत. पोतराज हे मरीआईचे उपासक जरीआई-मरीआई जरी म्हणजे तापाची मरी म्हणजे साथ रोगाची देवता मानली जाते.
१८९८ ते १९१९ पर्यंत महाराष्ट्रात प्लेग होता. तत्पूर्वी मानमोडी होती. यावेळी गावात पोतराज मरीआईचा गाडा घेऊन यायचे. शुक्रवार, मंगळवारी कडुनिंबाचा पाला, गोमूत्र टाकून गावातील महत्त्वाचे मार्ग शिंपीत जणू गावच सॅनिटाइझ करत होते, तर मांत्रिक छोट्या लाकडी नांगराने गावाभोवती पिठाने रेषा आखत. गावातून सव्वा महिना बाहेर न पडणे, घराबाहेरील अन्न न खाणे. म्हणजेच लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा हेतू असावा.
आजही आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात साथीचे आजार येऊ नयेत म्हणून साथीला कोंबडे, बकरे कापतात. काही ठिकाणी आषाढात अशीच जत्रा, बगाड करून रोगराई गावाबाहेर नेली जाते. काही ठिकाणी या देवतांना लाकडी गाडे, नांगर अर्पण करायची पद्धत आहे.
आता कोरोना महामारीत ग्रामीण भागात ठाकर, वडार व काही भटके या देवतांची पूजा करतात. कालपरत्वे या विधीचा वापर अनेक भगत, देवलशांनी स्वार्थासाठी केल्याने यात अंधश्रद्धा व दुष्कृत्य आली. विशेष म्हणजे या देवतांच्या विधी आणि नियमावलीबाबत मराठी ज्ञानकोशातही व्याख्या असल्याने त्यांचे प्राचीनत्व, लोकविधीचा प्रवास सिद्ध होतो.
.....................
कोतूळ गावात माझ्या घरासमोर नांगरबाबा आहे. माझे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी सांगायचे, एका देवलशाने गावाच्या कडेने छोट्या लाकडी नांगराने पिठाची सीमारेषा काढून प्लेगच्या साथ रोग काळात सव्वा महिना सीमाबंदी केली होती. गावात पाणी, गोमूत्र, लिंबाचा पाला टाकून सडा टाकत. खोकल्याची साथ आली तर गावाबाहेर खोकल्याईचे मंदिर आहे.
-सोपान घोलप, कोतूळ
..................
जुन्या चालीरीतीतील विधींमध्येही विज्ञान होते. आता लोक पोलिसांना घाबरतात, पूर्वी देवांना घाबरायचे म्हणून सगळे विधी चुकीचे म्हणता येणार नाहीत. लिंबाचा पाला व गोमूत्र ही जंतुनाशकेच आहेत. कुणाचे घरी खाऊ नका, हे वर्ज्य, तिथे जाऊ नका, सव्वा महिना वेस न ओलांडणे हे सर्व लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे प्रकार होते. यातही विज्ञान होतेच, फक्त आपण गैरफायदा घेतल्याने ती अंधश्रद्धा झाली.
-डाॅ. पांडुरंग बोरुटे, सेवानिवृत्त आरोग्य संचालक