उन्हाळ्याची सुटी सत्कारणी; शिक्षणसेवक बनला कोरोना काळातील रुग्णसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:51 IST2021-06-03T04:16:29+5:302021-06-03T11:51:30+5:30
देवदैठण : सध्याचा काळ हा कोरोना संकटाने भरलेला असताना समाजातील अनेक व्यक्ती या काळात कोरोनायोद्धा म्हणून कोरोना रुग्णांसाठी वेगवेगळ्या ...

उन्हाळ्याची सुटी सत्कारणी; शिक्षणसेवक बनला कोरोना काळातील रुग्णसेवक
देवदैठण : सध्याचा काळ हा कोरोना संकटाने भरलेला असताना समाजातील अनेक व्यक्ती या काळात कोरोनायोद्धा म्हणून कोरोना रुग्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत आहेत. त्यात डॉक्टर, नर्स, शिक्षक, पोलीस व अन्य घटक यांचा समावेश आहे. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील शिक्षणसेवक असणारे संदीप पोपट बोरगे हे कोरोना काळातील रुग्णसेवक बनले आहेत.
संदीप बोरगे हे रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणसेवक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी १ मेपासून देवदैठण येथे डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिर सुरू केले. त्याचवेळी बोरगे यांना उन्हाळ्याची सुटी लागल्यावर ते गावी आले. गावी आल्यानंतर ५ मेपासून आजपर्यंत कोविड सेंटरमधील रुग्णांची ते सेवा करत आहेत.

सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण याची व्यवस्था पाहणे, वाफ घेतली का? काही त्रास होतोय का? ऑक्सिजन पातळी तपासणी, औषधे देणे अशी सगळी जबाबदारी गेला महिनाभर या शिक्षणसेवकाने रुग्णसेवक म्हणून चोख बजावली आहे. सेंटरमधील रुग्ण जर घाबरलेला असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल तर त्याची आपुलकीने विचारपूस ते करतात. या काळात आपली सामाजिक बांधिलकी जपत ते करत असलेली रुग्णसेवा ही लाख मोलाची असून, आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर व समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. या कामात इतर मित्रही त्यांना साथ देत आहेत. बाेरडे यांनी ख्वाडा, बबन या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.
--
उन्हाळ्याच्या सुटीचा जरी आनंद घेता आला नसला तरी रुग्णसेवेपासून मिळणारा आनंद हा कैक पटीने मोठा आहे. रुग्णांसाठी दिवसभर सेवा देताना आई, वडील व भावासाठी जास्त वेळ देता येत नाही. रुग्णांची सेवा करताना ईश्वर सेवेचा अनुभव मिळत आहे. कोणतीच भीती वाटत नाही.
-संदीप बोरगे, शिक्षणसेवक, देवदैठण