वर्गणीचे पैसे परत कर म्हणत युवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:56+5:302021-09-09T04:25:56+5:30
नान्नज : वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत तालुक्यातील नान्नज (ता. जामखेड) येथील अमोल मधुकर दळवी या युवकास लाथाबुक्क्यांनी ...

वर्गणीचे पैसे परत कर म्हणत युवकास मारहाण
नान्नज : वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत तालुक्यातील नान्नज (ता. जामखेड) येथील अमोल मधुकर दळवी या युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पप्पू केरबा दळवी व राहुल नारायण दळवी दोघेही (रा.नान्नज) यांच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. ही घटना नान्नज येथे घडली.
नान्नज परिसरातील गोपाळपुरा येथे संत सेना महाराज मंदिर स्थापनेचे काम सुरू आहे. या कामाची सर्वस्वी जबाबदारी अमोल दळवी यांच्याकडे आहे. या मंदिराचे कामही पूर्णत्वास आले आहे. मंदिराची उभारणी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन ठरावीक रक्कम गोळा करून मंदिराचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी अमोल दळवी यांच्याकडे दिली. परंतु, पप्पू दळवी व राहुल दळवी यांनी अमोल दळवीला शिवीगाळ करत ‘तू काय पुढारी झाला काय, मंदिराचा सर्व पैशांचा व्यवहार तुझ्याकडे आहे, त्यातील वर्गणीचे काही पैसे आम्हाला दारू पिण्यासाठी दे’ म्हणत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असे अमोल दळवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.