खडीच्या पैशावरून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:35+5:302021-06-26T04:16:35+5:30
जामखेड : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत, असे म्हणत तालुक्यातील हळगाव बस ...

खडीच्या पैशावरून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण
जामखेड : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत, असे म्हणत तालुक्यातील हळगाव बस स्थानक परिसरात एका ठेकेदाराने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता यांना वाहनातून बाहेर ओढत मारहाण केली. याबाबत जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. याबाबत रवींद्र फकिरा संसारे यांनी फिर्याद दिली आहे.
रवींद्र संसारे हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता आहेत. २३ जून रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या हळगाव ते आघी, हळगाव ते गोयकरवाडी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. ते शासकीय वाहनाने हळगाव ते ढवळेवस्ती रस्त्याची पाहणी करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी हळगाव बसस्थानक परिसरात ठेकेदार शरद शिवराम पवार याने शासकीय वाहनाला त्याचे वाहन आडवे लावले. तुम्ही मला शिऊर ते बसरताडी रस्त्याच्या केलेल्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत? असे म्हणत त्याने संसारे यांना वाहनातून बाहेर ओढले व त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ठेकेदार शरद शिवराम पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करीत आहेत.